Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुंबईच्या खेळाडूचा नरवणे येथे विहिरीत बुडून मृत्यू
ऐक्य समूह
Wednesday, September 11, 2019 AT 11:10 AM (IST)
Tags: re2
5म्हसवड, दि 10 :  माण तालुक्यातील नरवणे येथे गणेशोत्सवानिमित्त भरविण्यात आलेल्या कबड्डी सामन्यासाठी आलेल्या मुंबईच्या खेळाडूचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. अविनाश अनंत शिंदे (वय 17, रा. इंदिरानगर, साईनाथनगर रोड, घाटकोपर)  असे मृत खेळाडूचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, नरवणे येथे गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धा सुरू आहेत.  येथील कबड्डी स्पर्धेसाठी 65 किलो वजनी गटातील अनेक संघ आले होते. त्यामध्ये मुंबई घाटकोपर येथील संघही आला होता. आज सकाळी या संघातील चार ते पाच खेळाडू आंघोळीसाठी खटकाळी शिवारातील कॅनॉलवर गेले होते. कॅनॉलमध्ये आंघोळ केल्यानंतर चांगल्या पाण्यात आंघोळ करावी म्हणून शेजारीच असलेल्या लक्ष्मण काटकर यांच्या मालकीच्या विहिरीत हे खेळाडू  गेले. त्यातील अविनाश शिंदे हा विहिरीत उतरला.  
पण त्याला पोहता येत नसल्याने तो बुडाला. उपस्थित खेळाडूंनाही पोहता येत नसल्याने त्याला वाचविता आले नाही. सदर घटनेची वार्ता नरवणे गावात  पसरताच घटनास्थळी गावकरी जमा झाले. पोलीस पाटील विजयसिंह काटकर यांनी सदर घटनेची माहिती दहिवडी पोलीस स्टेशनला दिली. घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले. नुकतेच उरमोडीचे पाणी आल्याने विहीर तुडुंब भरलेल्या असल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने चार ते पाच मोटर पंपाच्या सहाय्याने पाण्याचा उपसा सुरू केला. किरण काटकर या तरुणाने मोठ्या शिताफीने अविनाशचा मृतदेह बाहेर काढला. अविनाशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी दहिवडी  ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला होता. शवविच्छेदानंतर त्याचा मृतदेह मुंबईहून आलेल्या त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.  सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद दीक्षित व हवालदार संजय केंगले तपास करत आहेत.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: