Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विदर्भात पूरस्थिती; वैनगंगेला पूर
ऐक्य समूह
Wednesday, September 11, 2019 AT 11:00 AM (IST)
Tags: mn3
5भंडारा, दि. 10 (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशातील संजय सरोवराचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. आज कारधा येथील लहान पुलावरून वैनगंगेचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरून वाहतूक बंद करण्यात आली. सिहोरा-वाराशिवनी या आंतरराज्य मार्गावरील पुला वरून बावनथडी नदीचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूकसुद्धा बंद करण्यात आली. भंडारा शहराला लागून असलेल्या ग्रामसेवक कॉलनीतील काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. गोसे खुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आले आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी पूरस्थितीची पाहणी केली असून वैनगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. मध्य प्रदेशातील संजय सरोवराच्या खोर्‍यातही जोरदार वृष्टी होत असल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या पाण्यामुळे वैनगंगा नदीच्या पातळीत वाढ झाली होती.  
परंतु, पुन्हा अतिवृष्टी झाल्याने संजय सरोवराचे 10 दरवाजे 1.85 मीटरने उघडण्यात आले. त्यातून 75,400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत असल्याने वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडून नदीला पूर आला आहे. वैनगंगेची धोक्याची पातळी 245.00 मीटर आहे. आज ही पातळी 245.32 मीटरवर पोहोचली आहे. जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेक मार्गांवर पाणी आल्याने मार्ग बंद करण्यात आले आहेत. करचखेडा-सुरेवाडा, सिहोरा-बपेरा, तामसवाडी हे मार्ग बंद करण्यात आले आहेत तर भंडारा शहरानजिकच्या ग्रामसेवक कॉलनीत पुराचे पाणी शिरले आहे. वैनगंगेच्या जलसाठ्यात प्रचंड वाढ झाल्याने पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गोसे खुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे 2 मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून 4,85,192 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
महाराष्ट्र-मध्य प्रदेश राज्याचा संपर्क तुटला
संततधार पाऊस आणि धरणाचे पाणी नदीपात्रात सोडल्याने सिहोरा परिसरातून वाहणार्‍या वैनगंगा आणि बावनथडी नद्यांना पूर आला आहे. या दोन नद्यांचा संगम बपेरा गावाच्या शेजारी आहे. आंतरराज्यीय पुलावर 5 फूट पाणी असल्याने महाराष्ट्र-मध्य प्रदेश राज्याचा संपर्क तुटला.
जिल्हाधिकार्‍यांनी केली पूरस्थितीची पाहणी
मध्य प्रदेशातील संजय सरोवराचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कारधा येथील लहान पुलावरून पाणी प्रवाहित झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी पूरस्थितीची पाहणी केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: