Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विसर्जनासाठी सातारा जिल्हा प्रशासन सज्ज
ऐक्य समूह
Wednesday, September 11, 2019 AT 11:15 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 10 : गुरुवार दि. 12 रोजी अनंत चतुर्दशीच्या पार्श्‍वभूमीवर घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी सातारा जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून शहरात त्यावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. विसर्जनाच्या पार्श्‍वभूमीवर दि. 11 व 12 सप्टेंबर रोजी सातारा शहरातील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे, अशी माहिती  वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. एन. शेलार यांनी दिली.सातारा नगरपालिकेत सातारा शहर व परिसरातील 120 मंडळांनी नगरपालिकेकडे नोंदणी केली होती. घरगुती गणपतींसह सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे दि. 2 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात आगमन झाले होते. सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या महिन्यात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक गणेश मंडळांनी देखावे न करता अत्यंत साधेपणाने गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. दीड दिवसाचा, पाच दिवसांच्या घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर आता अनंत चतुर्दशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. घरगुती व गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी नगरपालिकेने सातारा शहरांमध्ये कृत्रिम तळे निर्माण केले असून विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे. घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी पालिकेने कुंडांची सोय केली आहे. विसर्जनात बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून कायदा व सुव्यवस्थेला बाधा येणार नाही त्यादृष्टीने पोलिसांनी सर्व त्या उपाययोजना केल्या आहेत. विशेषत: मिरवणुकीच्या मुख्य मार्गांवर सीसीटीव्ही कार्यरत करण्यात आले आहेत. दि. 11 व 12 सप्टेंबर रोजी सातारा शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींची विसर्जन मिरवणूक निघणार असल्याने शहर वाहतूक शाखेने दि. 11 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून दि. 13 रोजीच्या सकाळी 7 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. राजपथावर कमानी हौद, देवी चौक, मारवाडी चौक, मोती चौकापर्यंत येणार्‍या-जाणार्‍या सर्व वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. कमानी हौद ते शेटे चौकापर्यंत येणार्‍या-जाणार्‍या सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील. मोती चौक येथील एमएसइबी ऑफिस, समर्थ टॉकीज, राधिका टॉकीज चौक, ऐक्य प्रेस कॉर्नर, बुधवार नाका, गणेश विसर्जन कृत्रिम तलाव, कै. किसन आंदेकर चौक, करंजे पेठ पर्यंत येणार्‍या-जाणार्‍या सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद राहील. समर्थ मंदिर ते चांदणी चौक हा मार्ग अवघड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. बोगदा ते शाहू चौक हा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद राहील. सज्जनगड, कास पठाराकडे येणारी-जाणारी वाहने शेंद्रे मार्गे जातील-येतील. बोगदा, समर्थ मंदिराकडून चांदणी चौक मार्गे सातारा बस स्थानकाकडे येणारी-जाणारी सर्व वाहने चांदणी चौक, राजवाडा मार्गे न येता ती समर्थ मंदिर, आदालत वाडा, शाहू चौक मार्गे बसस्थानकाकडे जातील. मोळाचा ओढाकडून सातारा शहरात येणारी सर्व वाहने मोळाचा ओढा, महानुभाव मठ, करंजे, भूविकास बँक चौक मार्गे मार्गस्थ होतील. कोटेश्‍वर मंदिर, राधिका टॉकीज चौक, राधिका रोड मार्गे बसस्थानकाकडे येणारी सर्व वाहने कोटेश्‍वर मंदिर, शाहूपुरी, मोळाचा ओढा, महानुभव मठ मार्गे करंजे भूविकास बँक मार्गे बसस्थानकाकडे जातील. मोती चौकाकडे जाणारी वाहने शाहू चौक अदालत वाडा मार्गे समर्थ मंदिर मार्गस्थ होतील. शेटे चौक, शनिवार चौक, जुना मोटर स्टँड, मोती चौकाकडे जाण्यासाठी वाहतूक बंद असल्याने या परिसरात रहिवाशांनी आपली वाहने पर्यायी मार्गाने घेऊन जावे.
अशी असेल पार्किंगची व्यवस्था
मोती चौक, मारवाडी चौक, देवी चौक, कमानी हौद, शेटे चौक, शनिवार चौक, जुना मोटर स्टँड चौक, सम्राट चौक पुन्हा मोती चौक मार्गे काटदरे मसाले दुकान, एमएसईबी ऑफिस प्रतापगंज पेठ, समर्थ टॉकीज, राधिका टॉकीज चौक, ऐक्य प्रेस कॉर्नर, बुधवार नाका चौक, गणेश विसर्जन कृत्रिम तलाव, कै. किसन बा. आंदेकर चौक, करंजे पेठ असा श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग असून या कालावधीत सदर मिरवणूक मार्गावर शहरातील राहणार्‍या नागरिकांनी व परिसराकडे जाणार्‍या नागरिकांनी तसेच विसर्जन मिरवणूक विनाअडथळा सुरळीत पार पाडण्यासाठी शहरातील वाहतूक इतर मार्गाने वळविणे आवश्यक आहे. नागरिकांनी आपली वाहने तालीम संघ मैदान, गुरुवार परज, गांधी मैदान, कोटेश्‍वर मैदान या ठिकाणी अथवा आपल्या पर्यायी जागेत पार्किंग करावीत असे आवाहन शहर वाहतूक शाखेने केले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: