Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भाजपची आज तिसरी मेगाभरती
ऐक्य समूह
Wednesday, September 11, 2019 AT 10:57 AM (IST)
Tags: mn2
गणेश नाईक, कृपाशंकर सिंह, हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश !
5मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांना पक्षात घेण्याचा सपाटा लावला आहे. दि. 11 रोजी महाभरतीच्या तिसर्‍या फेरीत काही बडे नेते भाजपचे कमळ हातात घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते गणेश नाईक, काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माजी मंत्री कृपाशंकर सिंह आदी नेते बुधवारी भाजपत प्रवेश करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतरही भाजप-शिवसेनेने त्यावर समाधान न मानता विरोधी पक्षांना नेस्तनाबूत करण्याचा विडाच उचलला आहे. मेगाभरतीच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मधुकरराव पिचड, त्यांचे पुत्र आ. वैभव पिचड, सातार्‍याचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, गणेश नाईक यांचे चिरंजीव आ. संदीप नाईक, काँग्रेसचे आ. कालिदास कोळंबकर, राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर दुसर्‍या टप्प्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आमदार राणा जगजितसिंह, राष्ट्रवादीचे माजी खा. धनंजय महाडिक, काँग्रेस आ. जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बुधवारी मुंबईच्या गरवारे क्लब येथे दुपारी 3 वाजता आणखी एक भरती होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक, काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह, हर्षवर्धन पाटील, सत्यजित देशमुख आदी नेते उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
उदयनराजे, नारायण राणेंकडे लक्ष !
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारचे खासदार उदयनराजे भोसले भाजपत जाणार, अशी चर्चा गेले काही दिवस सातत्याने सुरु आहे. उदयनराजे काय करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्याच बरोबर माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे गेले अनेक दिवस भाजपत प्रवेश मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. शिवसेनेच्या नाराजीच्या भीतीने भाजपने अद्याप त्यांना प्रवेश दिला नाही. त्यामुळे त्यांचे काय होणार? शिवसेनेच्या नाराजीची पर्वा न करता भाजप त्यांना पक्षात घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
हर्षवर्धन, कृपाशंकर सिंह यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी!
काँग्रेसचे नेते, माजी संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील तसेच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी आज आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूरची जागा सोडायला तयार नसल्याने हर्षवर्धन पाटील यांनी भाजपत जाऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर कृपाशंकर सिंह यांनी कलम 370 रद्द करण्याला काँग्रेसने केलेला विरोध हे कारण पुढे करून राजीनामा दिला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: