Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाटण तालुक्यात कडकनाथच्या फसवेगिरीचा दुसरा बळी
ऐक्य समूह
Saturday, September 14, 2019 AT 11:16 AM (IST)
Tags: re1
शेतकर्‍याची पुण्यात आत्महत्या
5पाटण, दि. 13 : तालुक्यातील वनकुसवडे पठारावरील शेतकरी  शिवाजी गुणाजी पवार (वय-55), रा. काठी, ता. पाटण या शेतकर्‍याने आपल्या मुलाचा कडकनाथ कोंबडी व्यवसाय धोक्यात आल्याच्या कारणावरून पुणे येथे मुलाच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
 मुलगा जालिंदर शिवाजी पवार याने भागीदारीत सुमारे 8 लाख रुपयांचे कर्ज  काढून चार महिन्यापूर्वी काठी येथे महारयत अ‍ॅग्रो कंपनी कडून कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय सुरू केला होता. चार महिन्यातच महारयत अ‍ॅग्रो कंपनीच्या संचालकांनी कंपनीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून पोबारा केल्याने गुंतवणूक केलेले शेतकरी गोत्यात आले. हा धक्का सहन न झाल्याने शेतकरी शिवाजी गुणाजी पवार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येची तक्रार जालिंदर शिवाजी पवार याने कोथरूड (पुणे) पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान, कडकनाथ प्रकरणी पाटण तालुक्यात दुसरा बळी गेल्याने राज्यात एकच खळबळ माजली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शिवाजी गुणाजी पवार (वय- 55  रा. काठी, ता. पाटण) हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील होते. त्यांचा मुलगा  जालिंदर शिवाजी पवार हा कामानिमित्त कोथरूड (पुणे) येथे राहत होता. त्यालार जादा फायद्याचा कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाबाबत सोशल मीडिया आणि यु ट्युब वरून समजले असता त्याने गावातीलच मित्र योगेश रमेश कदम याला बरोबर घेऊन इस्लामपूर येथील महारयत अ‍ॅग्रोच्या कार्यालयात भेट दिली. तिथे कडकनाथ व्यवसायात कमी गुंतवणुकीत जादा लाभ मिळत असल्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून जालिंदर पवार व योगेश कदम यांनी गावी कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय करायचे ठरवले. त्या दृष्टीने त्यांनी कर्ज काढून कडकनाथ कोंबडीची चार युनिट इस्लामपूर   कार्यालयात पैसे देऊन खरेदी केली. यावेळी कार्यालयात महारयत अ‍ॅग्रोचे संचालक सुधीर शंकर मोहिते, संदीप सुभाष मोहिते व सागर सदाशिव खोत हे उपस्थित होते असे आपल्या तक्रारीमध्ये दाखल केले आहे.  कडकनाथ साठीचे खाद्य, औषध खर्च, शेड व निवारा यासाठी सुमारे आठ लाखाहून अधिक पैसे खर्च झाले. प्रोजेक्ट युनिट सुरू अवघे चार महिने झाले. सदर प्रकरण फसवे निघाले. यात पवार आणि कदम कुटुंबीय  हतबल झाले. राज्यभरातच कडकनाथ पालक शेतकरी फसले गेले आणि यातील पैसे परत मिळणार नाहीत, या विचाराने मुलाची चाललेली हतबलता पाहून शिवाजी गुणाजी पवार यांना मानसिक  धक्का बसला. या मानसिक विचाराने कष्ट करून सुखासमाधानाने जगणारा सर्वसामान्य शेतकरी बळीराजा शिवाजी गुणाजी पवार यांनी 9 सप्टेंबर रोजी रात्री 1 वाजता पुणे येथे मुलाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कडकनाथ पालक शेतकरी फसवणूक प्रकरणातील त्यांचा दुसरा बळी ठरला. या प्रकरणी जालिंदर शिवाजी पवार यांनी कोथरूड (पुणे) पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, यापूर्वी मागील आठवड्यात पाटण येथील कडकनाथ प्रकरणात फसलेले अनिल आर्डे यांचे वडील खाशाबा आर्डे यांचा कडकनाथ प्रकरणाच्या धक्क्याने मृत्यू झाला होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: