Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात रविवारी दोन महासभा
ऐक्य समूह
Saturday, September 14, 2019 AT 11:12 AM (IST)
Tags: lo1
भाजपच्या महाजनादेश यात्रेचे आगमन
5सातारा, दि. 13 : भाजपच्या तिसर्‍या टप्प्यातील महाजनादेश यात्रेचे आगमन सातारा जिल्ह्यामध्ये रविवार, दि. 15 सप्टेंबर रोजी होणार आहे. यादरम्यान दोन स्वागत सभा आणि दोन महासभांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिली सभा सातारा येथील सैनिक स्कूलवर तर दुसरी महासभा कराड येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आयोजित करण्यात आली असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाजपच्या महाजनादेश यात्रेची माहिती देण्यासाठी येथील प्रीती एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपचे उपजिल्हाध्यक्ष धनंजय जांभळे, नगरसेवक विजय काटवटे, सातारा तालुकाध्यक्ष अभय पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
विक्रम पावसकर पुढे म्हणाले, रविवार, दि. 15 सप्टेंबर रोजी भाजपच्या महाजनादेश यात्रेचे स्वागत शिंदेवाडी येथे करण्यात येणार आहे. तेथून यात्रेचे आगमन शिरवळ, खंडाळा, वेळे, सुरूर येथे होईल. सुरूर येथे स्वागत झाल्यानंतर यात्रा वाई येथे जाईल त्या ठिकाणी स्वागत सभा होईल. तेथून महाजनादेश यात्रा पाचवड, वाढे फाटा येथे येईल.    
वाढे फाटा येथून यात्रेसमवेत दुचाकी रॅली काढण्यात येईल. महाजनादेश यात्रा सातारा येथील सैनिक स्कूल पटांगणावर आल्यानंतर त्या ठिकाणी दुपारी 3.30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर महासभा होईल. सातारा येथील सभेनंतर यात्रा बॉम्बे रेस्टॉरंट चौक मार्गे कराडकडे प्रयाण करेल. यात्रेचे नागठाणे येथे स्वागत करण्यात येईल. तेथून दुचाकी रॅली समवेत यात्रा उंब्रज, मसूरमध्ये दाखल होईल. मसूरमध्ये सायंकाळी 5.30 वाजता स्वागत सभा होईल. तेथून पुढे जाणार्‍या यात्रेचे कोपर्डे हवेली, कृष्णा कॅनॉल या ठिकाणी स्वागत करण्यात येईल. तदनंतर कराड येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महासभा होईल.
सभेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कराड येथे मुक्काम करणार असून सोमवारी सकाळी 9.30 वाजता ते पत्रकार परिषदेत वार्तालाप करणार आहेत. तदनंतर महाजनादेश यात्रा सांगली जिल्ह्याकडे रवाना होईल. भाजपची महाजनादेश यात्रा सातारा जिल्ह्यामध्ये 9 तास चालणार आहे. यात्रेच्या रथावर फुलांची उधळण करून स्वागत करण्यात येईल. यात्रेदरम्यान कोठेही फटाक्यांची आतिषबाजी केली जाणार नाही, असे सांगून विक्रम पावसकर पुढे म्हणाले, जाहीर सभांमध्ये मुख्यमंत्री गेल्या पाच वर्षांत राज्य आणि केंद्र शासनाने कोणती कामे केली याची माहिती देणार आहेत. यात्रेदरम्यान कोणाचाही पक्ष प्रवेश घेतला जाणार नाही.
विधानसभानिहाय सर्वेक्षण
पक्ष प्रवेशामुळे विधानसभेसाठी अनेक जण इच्छुक असल्याचे निदर्शनास आणून देताच पावसकर म्हणाले, 15 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभानिहाय एका टीम च्या माध्यमातून सर्वेक्षण केले असून सर्वेक्षणात ज्याचे नाव वर असेल त्यालाच उमेदवारी दिली जाईल. अन्य पक्षातून प्रवेश दिल्यामुळे भाजपतील प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होणार का? या विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले, कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: