Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मालट्रकवर ट्रॅव्हल्स आदळून 6 ठार 20 जखमी
ऐक्य समूह
Saturday, September 14, 2019 AT 11:25 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 13 : पुणे-बंगलोर महामार्गावर सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटे 5 वाजता डीमार्ट मॉलजवळ मुंबईकडून बेळगावकडे जाणार्‍या ट्रॅव्हल्सने दुभाजकाला धडकून या अपघातग्रस्त झालेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी झाले. मृतांमध्ये बेळगावमधील तिघांचा समावेश आहे. अब्बास अली (वय 42), रा. अनगोळ, विश्‍वनाथ गड्डी (वय 55), रा. हुक्केरी, रवींद्र अशी त्यांची नावे आहेत. अनंत चतुर्दशी दिवशी घडलेल्या अपघाताने सातार्‍यात हळहळ व्यक्त झाली.
याबाबत अपघात स्थळावरून मिळालेली माहिती अशी, की पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एस आर एस कंपनीची ्रॅव्हल्स (केए 01- एएफ- 9506) मुंबईहून बेळगावकडे निघाली होती. ही ट्रॅव्हल्स सातारा नजीक असणार्‍या डीमार्ट जवळ आली असता टायर फुटून दुभाजकाला धडकलेल्या ट्रकला जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता, की ट्रॅव्हल्सच्या पुढच्या बाजूचा चक्काचूर झाला.
या अपघातात विश्‍वनाथ विरुप्पाकशी गड्डी (वय 55), रा. हुक्केरी, अब्बास अली (वय 42), रा. अनगोळ, अशोक रामचंद्र जुनघरे (वय 50), रा. दिवदेववाडी, ता. जावली, डॉ. सचिन शंकरगोंडा पाटील (वय 35), गुंडू तुकाराम गावडे (वय 32) यांच्यासह एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. याचबरोबर सुमेधा तीरवार (वय 22), राजश्री जयदीप पाटील (वय 23), जयदीप रामचंद्र पाटील (वय 30, सर्व रा. बेळगाव) यांच्यासह 12 जण जखमी झाले आहेत. ट्रॅव्हल्समधून एकूण 30 प्रवासी प्रवास करत होते. यावेळी दोन चालक व क्लिनरही गाडीत होते. दरम्यान, या अपघाताची सातारा तालुका पोलीस ठाण्यात माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सर्व्हिस रोडवरून वळवत सुरळीत केली आणि जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. मुंबईहून बेळगावला निघालेल्या या ट्रॅव्हल्समध्ये अनेक गणेशभक्त होते. अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने घरी जाऊन गणपती विसर्जन करण्यासाठी काही निघाले होते. मात्र पहाटे गाढ झोपेत असतानाच सातार्‍यानजीक मृत्यूने त्यांच्यावर घाला घातला अपघात स्थळाचे चित्र प्रचंड विदारक होते. संपूर्ण ट्रॅव्हल बसची एक बाजू पूर्णपणे चक्काचूर झाली होती. अपघाताचे वृत्त कळताच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे व त्यांच्या सहकार्‍यांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली. बसमधील जखमींना तातडीने बाहेर काढून सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले तसेच काही गंभीर जखमींना खासगी रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. अपघाताचे वृत्त कळताच जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, तहसीलदार आशा होळकर यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. जखमींना तातडीने मदत उपचार देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
अपघातस्थळी विदारक चित्र
अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने गणेशाचे दर्शन घेऊन भाविक निघाले होते. मात्र काळाने पहाटेच त्यातील सहा जणांवर घाला घातला. तर वीस जण जखमी झाले या सर्वांचे साहित्य महामार्गावर विखुरले होते. अपघाताचा प्रचंड धक्का येथील जखमींना बसला होता. ट्रॅव्हल बसची झालेली दुरवस्था पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकत होता. एकीकडे गणेश बंदोबस्ताचा ताण नसताना मात्र सातारा पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी जाऊन जखमींना वेळेवर मदत उपलब्ध करून दिली. या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: