Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राज्याला सर्वसंपन्न बनविण्यासाठी भाजपला साथ द्या : मुख्यमंत्री
ऐक्य समूह
Monday, September 16, 2019 AT 11:13 AM (IST)
Tags: re2
5वाई, दि. 15 ः काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने पंधरा वर्षांत जेवढी कामे केली नाहीत त्याच्या दुप्पट कामे आम्ही पाच वर्षांत केली आहेत. दरवर्षी शेतकर्‍यांना कर्जमाफीसाठी 10 हजार कोटी रुपये थेट खात्यात जमा केले. हजारो किलो मीटरचे रस्ते, 18 हजार गावांना पिण्याचे पाणी पुरविण्यात आम्ही यशस्वी झालो. शिक्षणात आपले राज्य देशात तिसर्‍या स्थानी आणले. तर आरोग्य, उद्योग, गुंतवणूक क्षेत्रात देशात प्रथम क्रमांकावर आहे. देशातील सर्वाधिक 25 टक्के रोजगार निर्माण करणारे आपले महाराष्ट्र राज्य आहे. ग्रामीण भागात 7 लाख तर शहरी भागात 5 लाख घरे निर्माण केली. देश पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मजबूत बनत आहे. राज्यालाही तसेच मजबूत व सर्वसंपन्न बनविण्यासाठी भाजपला साथ द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भारतीय जनता पार्टीच्यावतीने काढण्यात आलेल्या महाजनादेश यात्रेचे आज वाईमध्ये 3.27 वाजता शिवाजी चौकात आगमन झाले. त्यावेळी ते बोलत होते. त्यांचे किसन वीर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले यांनी स्वागत केले. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खा. संजय तांदळे, ना. नरेंद्र पाटील, आ. सुजित ठाकूर, आ. बाळासाहेब भेगडे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, येथे जमलेला प्रचंड जनसमुदाय पाहून ही स्वागताची महासभा असल्याचा आभास होत आहे. पाच वर्षांत युती शासनाने केलेल्या कामांचा लेखाजोखा आपल्यासमोर मांडण्यासाठी ही महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. यातून जनसामान्यांशी संवाद साधायचा आहे. पाच वर्षांत सर्वच प्रश्‍न आम्ही सोडविले आहेत, असे मी म्हणत नाही. परंतु एक उज्ज्वल राष्ट्र निर्मितीसाठी आम्ही कसोशीने व भ्रष्टाचारमुक्त कारभार केला आहे. शासकीय जागेवरील अतिक्रमणे नियमित करून त्यांना मालकी हक्क देण्यात येत आहेत. गेल्या पाच-सहा महिन्यात वाई शहराच्या व तालुक्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. वाई-खंडाळा, महाबळेश्‍वरच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडू दिला जाणार नाही. मोदींच्या नेतृत्वाखाली देश बलशाही होत आहे. भारताकडे वाकडी नजर करून पाहण्याचे कोणाचे धारिष्ट्य होत नाही. मागील सत्तर वर्षांचे अखंड भारताचे स्वप्न मोदींनी 370 कलम हटवून पूर्ण केले.
सत्तर वर्षांत पहिल्यांदाच जम्मू- काश्मीरमध्ये भारतीय ध्वज फडकला. समृध्द देशाबरोबरच समृध्द महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठी आपला जनादेश हवा आहे. आपण मदनदादांच्या पाठीशी उभे राहून आपला आशीर्वाद द्यावा. विधानसभेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकवू.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ शेलार, शहराध्यक्ष अजित वनारसे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास माजी आ. कांताताई नलावडे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, अविनाश फरांदे, सचिन घाटगे, यशवंत लेले, नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभा शिंदे, पाचगणीच्या नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी कर्‍हाडकर, महाबळेश्‍वरच्या नगराध्यक्षा सौ. स्वप्नाली शिंदे, सौ. नीलिमा भोसले, सौ. अनुराधा भोसले, श्रीमती विजयाताई भोसले, भय्यासाहेब जाधवराव, सयाजी पिसाळ, मोहन भोसले, सौ. सुरभी चव्हाण, प्रशांत नागपूरकर, राकेश फुले, देवानंद शेलार, सचिन गांधी, राहुल झोरे, विजेंद्र शिंदे, रोहिदास पिसाळ, सतीश भोसले, सतीश शेंडे, राजाभाऊ खरात, शशिकांत खाडे, मधू नेने, सतीश वैराट, अमित वनारसे, सौ. रुपाली वनारसे, सौ. वासंती ढेकाणे, सौ. सुनीता चक्के, गजानन भोसले, सौ. गोरे, शेखर शिंदे, नंदकुमार खामकर, प्रदीप क्षीरसागर, अ‍ॅड. जगदीश पाटणे, डॉ. शेखर कांबळे, संदीप कोरडे, केतन भोसले, सौ. सुधा साबळे, आनंदराव शेवडे, श्रीमती विजयाताई नेवसे, श्रीमती विजया कुबेर, राजेश शिर्के, ननावरे, महेंद्र धनवे, संतोष जमदाडे, मधुकर शिंदे, शेखर भोसले, किसनशेठ शिंदे, रामभाऊ शिंदे, नंदकुमार बावळेकर, सुनील शिंदे, तुकाराम बावळेकर, गजानन फळणे, तानाजी भिलारे, मंगेश उपाध्ये, किसन बावळेकर, मेहुल पुरोहित, चेतन पार्टे आदींसह वाई व महाबळेश्‍वर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चार एलईडीवरून मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचेप्रक्षेपण करण्यात आल्याने उपस्थितांना व्यवस्थित भाषण पाहता व ऐकता आले. महारथाच्या गाडीच्या दोन्ही बाजूस मान्यवरांसाठी व्यासपीठ बनवण्यात आले होते. यात्रेच्या स्वागतासाठी कृष्णाई कला मंचच्यावतीने भव्य रांगोळी रेखाटण्यात आली होती. जिल्हाधिकारी सौ. श्‍वेता सिंघल, तहसीलदार रणजित भोसले व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख धीरज पाटील, पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक नीळकंठ राठोड, विकास बडवे, पोलीस उपनिरीक्षक मोतेकर आदींसह वाई, भुईंज, पाचगणी, महाबळेश्‍वर, फलटण, दहिवडी, मेढा पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
वीज वितरणचे कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर, उपकार्यकारी अभियंता अविनाश खुस्पे व त्यांच्या सहकार्‍यांनी सुरूर ते वाई व वाई ते पाचवड मार्गावरील वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या वीज वाहिन्यांची दुरूस्ती व देखभाल करून त्यांची उंची वाढविण्याचे काम केले. तर सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता श्रीपाद जाधव, शाखा अभियंता संजय शिंदे आदींनी यात्रा मार्गावरील खड्डे बुजवून अडथळा ठरणार्‍या झाडांच्या फांद्यांचा अडसर दूर केला होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: