Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी 125 जागा लढविणार
ऐक्य समूह
Monday, September 16, 2019 AT 10:58 AM (IST)
Tags: re1
5पुणे, दि. 15 (प्रतिनिधी) : येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडी करणार असून त्यांचा जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला आहे. विधानसभेच्या 288 जागांपैकी 125 जागा काँग्रेस तर 125 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढविणार आहे. उर्वरीत 38 जागा मित्रपक्षांना देण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषेदेत दिली.
येत्या काही दिवसातच विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्वच पक्षांनी ‘महाजनादेश यात्रा,’ ‘शिवस्वराज्य यात्रा’, ‘जनआशीर्वाद’ अशा विविध यात्रांचे आयोजन करून आपले शक्तिप्रदर्शन केले आहे. सध्या भाजप आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असल्याने या पक्षांची युती होणार की नाही, असा प्रश्‍न सर्वांना पडलेला असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीवर मात्र शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष जर एकत्र लढले असते तर गेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल वेगळा लागला असता, असे सांगत मागची चूक आता न करता दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आघाडीवर शिक्कामोर्तब केले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
ते म्हणाले, दोन्ही पक्ष प्रत्येकी 125 जागा लढविणार आहे.
 या जागांमधील 5 ते 6 जागा अशा आहेत, ज्या राष्ट्रवादीकडे असून काँग्रेस त्या जागांची मागणी करत आहे. तर, 5 ते 6 जागा ज्या काँग्रेसकडे आहेत. त्या जागांची मागणी राष्ट्रवादी करत आहे. त्यामुळे सामंजस्याने या जागांची अदलाबदली करण्यात येईल. त्याचप्रमाणे उर्वरीत 38 जागा मित्र पक्षांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: