Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महाजनादेश यात्रेसह कराडकरांचा अतुल भोसलेंना आशीर्वाद : मुख्यमंत्री
ऐक्य समूह
Tuesday, September 17, 2019 AT 11:13 AM (IST)
Tags: re1
5कराड, दि. 16 ः माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यापेक्षा जास्ती निधी आमदार नसताना डॉ. अतुल भोसले यांनी कराड दक्षिणमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून आणला आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा मतदारसंघात उमटला आहे. आजच्या समारंभाचे नेटके नियोजन त्यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीत या महाजनादेश यात्रेसह कराडकरांचा आशीर्वाद अतुल भोसलेंना लाभेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिली.  
येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर महाजनादेश यात्रेच्या सातारा जिल्ह्यातील सांगता सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री ना. चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजप कार्यकारिणी सदस्य भरत पाटील, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महा-युती सरकारची कामगिरी सांगायला महाजनादेशच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधायला आलो आहे. विधानसभेचा निकाल पक्का आहे. विधानसभेत पुन्हा भाजप महायुतीचा विजय होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कराड दक्षिणमध्ये आपल्याला यावेळी चूक करायची नाही. अतुल भोसलेंना पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी समितीचे अध्यक्ष केल्यानंतर त्यांनी नि:स्वार्थपणे सेवा केली आहे यामुळे यावेळी अतुल भोसलेंना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.
ना. डॉ. अतुल भोसले म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. भाजप महायुती सरकारने कराड दक्षिणला भरभरून निधी दिला आहे. मुख्यमंत्र्यांकडे जेवढी कामे मागितली तेवढी कामे त्यांनी मंजूर केली. मुख्यमंत्री फडवणीस यांनी 1176 कोटी 88 लाख 97 हजार रुपयांचा निधी आजपर्यंत कराड दक्षिणला दिला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1800 कोटी रुपयांची कामे केल्याचे फलक लावत आहेत. भूकंप संशोधन प्रकल्पाच्या  फलकावर 550 कोटींची विकासकामे केल्याचा उल्लेख आहे. यातील  फक्त 48 कोटी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत आणले. उर्वरित निधी हा मोदी सरकारने दिला आहे. त्यामुळे या कामाचे श्रेय त्यांनी घेऊ नये. महसमूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कराड दक्षिणसाठी मंजूर केलेल्या विकासकामांचे उद्घाटन सध्या माजी मुख्यमंत्री करत आहेत. या कामांच्या तांत्रिक बाबी पूर्ण नसताना ही उद्घाटने अनधिकृतपणे करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम ते करत आहेत.
विक्रम पावसकर म्हणाले, सातारा जिल्ह्यात भाजपचा एक खासदार झाला असून दुसरा खासदार व आठ आमदार महायुतीचे करण्यासाठी सर्वांनी संकल्प करावा. शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी आभार मानले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: