Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातारा शहराच्या हद्दवाढीला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील
ऐक्य समूह
Tuesday, September 17, 2019 AT 10:54 AM (IST)
Tags: lo1
शिवेंद्रसिंहराजेंचा यशस्वी पाठपुरावा; शहरातील रस्त्यांसाठीही 50 कोटींचा निधी
5सातारा, दि. 16 : गेल्या अनेक वर्षांपासून या ना त्या कारणांमुळे सातारा शहराचा हद्दवाढीचा प्रलंबित राहिलेला प्रश्‍न अखेर मार्गी लागला आहे. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हद्दवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी सातात्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. नुकत्याच सातारा येथे झालेल्या भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या जाहीर सभेत पुन्हा एकदा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रश्‍न  निवडणुकीपूर्वी तातडीने मार्गी लावावा, अशी आग्रही मागणी केली. शिवेंद्रसिंहराजे यांनी मागणी करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा शहराच्या हद्दवाढीला मंजुरी देत असल्याचे जाहीर केले. यावरच न थांबता रात्री त्यांनी राज्याच्या नगरविकास खात्याला तशा सूचना दिल्या.
शिवेंद्रसिंहराजे यांनी शहरातील रस्ते काँक्रिटचे करण्यासाठी आचारसंहितेपूर्वी निधी द्यावा, अशी मागणी केली. त्यालाही मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला असून या कामासाठी त्यांनी 50 कोटी रुपये निधी देण्याचे जाहीर केले. हद्दवाढ आणि काँक्रिटचे रस्ते या दोन्ही प्रश्‍नांबाबत शिवेंद्रसिंहराजे यांनी आग्रही भूमिका घेतली आणि हे दोन्ही प्रश्‍न मार्गी लागल्याने सातारकरांमधून समाधान व्यक्त होत आहे.
नगरविकास विभागाकडून हद्दवाढीच्या प्रस्तावाबाबत हरकती मागवण्यात आल्या. काही त्रुटी असल्याने हा प्रस्ताव प्रलंबित राहिला. मात्र, शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रश्‍न तडीस नेण्यासाठी पाठपुरावा सुरु ठेवला होता. मुंबई येथे अधिवेशनादरम्यान शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून  चर्चा केली हेती. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळीही हद्दवाढीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीला मंजुरी देत जाहीर सभेतच मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढ मंजूर करण्याची घोषणा केली काँक्रिटच्या रस्त्यांसाठी 50 कोटी निधी देण्याचे आश्‍वासन दिले. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावरच न थांबता दोन्ही प्रश्‍न निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मार्गी लागावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.      त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रात्री नगरविकास खात्याच्या अधिकार्‍यांना सूचना करुन दोन्ही प्रश्‍न मार्गी लावले.  सोमवारी सकाळी शिवेंद्रसिंहराजे यांनी नगरविकास विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांना दूरध्वनी करुन मुख्यमंत्र्यांनी काँक्रिटच्या रस्त्यांसाठीही 50 कोटी निधी देण्याचे मान्य केले असून याबाबत पुढे काय कार्यवाही झाली का याची विचारणा केली. त्यावर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सातारा शहरातील काँक्रिटच्या रस्त्यांना 50 कोटी मंजूर करण्यात आले असून सदर कामांचे प्रस्ताव मागवण्यात आल्याचे त्या अधिकार्‍याने सांगितले. एकंदर शिवेंद्रसिंहराजे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शहराच्या हद्दवाढीचा प्रश्‍न निकाली निघाला असून शहरातील खड्डेयुक्त रस्त्यांची समस्याही काँक्रिट रस्त्यांमुळे निकाली निघणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: