Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खा. शरद पवार यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची टीका
ऐक्य समूह
Tuesday, September 17, 2019 AT 11:15 AM (IST)
Tags: re3
5कराड, दि. 16 : शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यांनी बोलताना त्यांच्या वक्तव्याचा फायदा भारताला होईल की पाकिस्तानला होईल याचा विचार करणे गरजेचे आहे. राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये असेच काही वक्तव्य केल्यानंतर पाकिस्तानने युनायटेड नेशन्समध्ये भारतीय नेते आमच्यासोबत असल्याचे सांगितले होते. निवडणुका येणार-जाणार; परंतु मते मिळवण्यासाठी अशी देशविरोधी वक्तव्ये करणे चांगले नाही. भारतीय मुसलमान हा देशाविषयी अभिमान राखणारा आहे. पवारांनी पाकिस्तानचे कौतुक केले म्हणून मुस्लीम लोक त्यांना मते देतील, असा विचार करणारा राष्ट्रवादी पक्ष कोणत्या मानसिकतेत आहे हे समजते, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या 19 दिवसांपासून तिसर्‍या टप्प्यातील महाजनादेश यात्रा सुरू आहे. पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा जिल्हा करत सोमवारी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात जाणार आहे. आतापर्यंत 3 हजार 189 किलोमीटरचा प्रवास केला असून 112 विधानसभा मतदारसंघात यात्रा गेली असून तिला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
सध्या महाराष्ट्रात विक्रमी पाऊस पडत आहे. त्याचे प्लॅनिंग करणे गरजेचे आहे. जपानसारख्या देशात पूर आणि भूकंप नेहमी होतात. मात्र यावर नियंत्रण करता येते. वर्ल्ड बँकेने असे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले आहे ज्यामुळे पूरनियंत्रण करता येते. त्यादृष्टीने वर्ल्ड बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेची मल्टिएक्स्पर्टची 22 लोकांची टीम महाराष्ट्रात गेली आहे. त्यांच्यापुढे आम्ही प्रपोजल मांडले होते. त्यानंतर डिझास्टर प्रूफ इन्फ्रास्ट्रक्चर कसे तयार करता येईल हे पाहणार आहोत. फक्त डॅम मॅनेजमेंट करून हे पुराचे पाणी थांबवता येत नाही. त्यामुळे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर अपडेट करणे गरजचे आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काल म्हणाले, महाराष्ट्र रोजगार निर्मितीत 8 व्या क्रमांकावरून 13 व्या क्रमांकावर गेला. ते एक सत्य बोलले, की त्यांच्या काळात महाराष्ट्र 3 र्‍या क्रमांकावरून 8 व्या क्रमाकांवर गेला होता; परंतु आज महाराष्ट्रातील गुंतवणूक ही देशात आलेल्या एकूण गुंतवणुकीच्या 49 टक्के आहे. ही सगळी आकडेवारी केंद्र सरकारच्या वेबसाईटवर आहे, तरीही बाबा म्हणतात, की मला आकडेवारी दिली नाही. मला पृथ्वीराज बाबांना विचारायचे आहे, तुम्ही 370 च्या बाजूचे की विरोधाचे? काश्मीरमध्ये भारताच्या तिरंग्याला महत्त्व मिळावे की काश्मीरच्या झेंड्याला मिळावे? देशामध्ये आरक्षण आणि काश्मीरमध्ये आरक्षणाच्या विरोधात? भारतातील कोणालाही काश्मीरमध्ये सुईच्या टोकाएवढी जमीन घेता येत नाही. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आता सातारा जिल्ह्यात त्यांचे अस्तित्व राहते की नाही, म्हणून टीका करणे सुरू आहे. आम्ही विदर्भाला आणि पश्‍चिम महाराष्ट्रालाही निधी दिला आहे. यांच्या काळात निधी कुठे गेला, हे मी सांगण्याची गरज नाही. सातारा जिल्ह्यात आम्ही मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे, असे ना. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: