Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अयोध्या प्रकरणी दोन्ही पक्षकार तडजोडीच्या विचारात
ऐक्य समूह
Tuesday, September 17, 2019 AT 11:08 AM (IST)
Tags: na3
5नवी दिल्ली, दि. 16 (वृत्तसंस्था) : अयोध्येतील वादग्रस्त जमिनीबाबत हिंदू आणि मुस्लीम पक्षकारांकडून सुरुवातीला न्यायालयाबाहेर तडजोड होऊ न शकल्याने गेल्या 23 दिवसांपासून या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालायात नियमित सुनावणी सुरू झाली आहे. मात्र, आता पुन्हा एकदा मध्यस्थीद्वारेच या प्रकरणावर तोडगा निघावा यासाठी दोन्ही पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालायाने स्थापन केलेल्या मध्यस्थी पॅनलला पत्र लिहिले आहे.
सर्वोच्च न्यायालायात नियमित सुनावणी होण्यापूर्वी न्यायालयाने मध्यस्थीने यावर तोडगा निघावा यासाठी एका पॅनलची स्थापना केली होती. या पॅनलद्वारे तोडगा काढण्यासाठी 155 दिवस प्रयत्न झाले मात्र, यावर कोणताही तोडगा निघू शकला नव्हता. सर्वोच्च न्यायालायाने नेमलेल्या या पॅनलमध्ये सर्वोच्च न्यायालायाचे न्या. एफ. एम. कलीफुल्ला, वरिष्ठ वकील श्रीराम पंचू आणि आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर या तीन व्यक्तींचा समावेश आहे. मात्र, पॅनलद्वारेही तोडगा निघू न शकल्याने अखेर सर्वोच्च न्यायालायाने या प्रकरणी नियमित सुनावणी घेण्याचा निर्णय झाला.
या सुनावणीदरम्यान हिंदू पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. तर मुस्लीम पक्ष आता आपली बाजू मांडत आहे. पाच सदस्यांच्या घटनापीठाद्वारे या प्रकरणाची सुनावणी सुरु असून यामध्ये सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली न्या. एस. ए. बोबडे, डी. वाय. चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस. अब्दुल नजीर यांचा समावेश आहे.
दरम्यान, या प्रकरणातील मुस्लीम पक्षकार सुन्नी वक्फ बोर्ड ज्यांनी या वादग्रस्त जमिनीवर आपला मालकी हक्क सांगितला आहे, त्यांनीच मध्यस्थीसाठी पत्र लिहिले आहे. त्यांनी म्हटलंय, की चर्चेद्वारे हा प्रश्‍न सोडवण्याची पुन्हा एकदा प्रयत्न करायला हवेत. त्याचबरोबर, निर्वाणी आखाड्याने देखील चर्चेद्वारे प्रश्‍न सोडवण्याची इच्छा व्यक्त करीत पॅनलला पत्र लिहिले आहे. निर्वाणी आखाड्याच्या भूमिकेवर या प्रकरणातील एक पक्षकार निर्मोही आखाडा देखील सहमत आहे.
 मंदिराबाबत केंद्राने धाडसी पाऊल उचलावे : उद्धव ठाकरे
राम मंदिराबाबत केंद्र सरकारने धाडसी पाऊल उचलावे, अशी मागणी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केली. आम्ही पहिल्या दिवसापासून राम मंदिरासाठी आग्रही आहोत. न्यायालयात अंतिम सुनावणी सुरु आहे. सर्वोच्च न्यायालाय योग्यच निर्णय घेईल, मात्र केंद्र सरकारने योग्य पावले उचलावीत, असे त्यांनी म्हटले आहे. काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेले अनुच्छेद 370 कलम रद्द करण्याबाबत सरकारने जसा धाडसी निर्णय घेतला अगदी तसाच धाडसी निर्णय राम मंदिराच्या निर्मितीबाबत  मोदी सरकारने घेतला पाहिजे. राम मंदिराबाबत विशेष कायदा करुन सरकारने हा निर्णय घ्यावा. आता आणखी वेळ घालवू नये आम्ही खूप वेळ वाट पाहिली असल्याचे त्यांनी सांगितले. आरेबाबतही या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली. नाणारचं जे झालं तेच आरेचं होईल, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मेट्रो कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीला उद्धव ठाकरे यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे येत्या काळात आरेतील मेट्रो कारशेडवरुन भाजप आणि शिवसेना यांच्यात वाद जुंपण्याची चिन्हं आहेत.
आपल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी सामनातील अग्रलेखाबाबतही भूमिका स्पष्ट केली. उदयनराजे यांचा अपमान करण्याचा हेतू अजिबात नाही. त्यांच्याकडून काही अपेक्षा होत्या त्याच अग्रलेखात मांडण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या त्यांनाच सांगणार ना, असाही प्रश्‍न उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: