Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
युती सरकारची जाहिरातबाजीमध्येही ‘बनवाबनवी’ : विजय वडेट्टीवार
ऐक्य समूह
Wednesday, September 18, 2019 AT 11:01 AM (IST)
Tags: mn4
5मुंबई, दि. 17 (प्रतिनिधी) : राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात फसवण्याचा उद्योग करून जनतेची दिशाभूल केली आहे. आता जाहिरातबाजीतही त्यांनी खोटारडेपणाची सीमा ओलांडली आहे. आरोग्य विभागाच्या जाहिरातीत दिलेली माहिती पूर्णत: खोटी असल्याचा आरोप करतानाच सरकारचा उतावीळ कारभार पाहता, ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय’, अशी अवस्था असल्याचा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने सुरू केलेल्या जाहिरातबाजीचा समाचार घेताना ते म्हणाले, सरकारची पाच वर्षातील कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची झाली आहे. कोणताही घटक सरकारच्या कामगिरीवर समाधानी नाही. असे असताना ‘सर्वोत्तम कामगिरी, महाराष्ट्र मानकरी’, या जाहिरातीतून आपल्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली आहे. परंतु या जाहिरातबाजीतील दावाही खोटा निघाला आहे. आरोग्य विभागाच्या पानभर जाहिरातीमध्ये बाईक अ‍ॅम्ब्युलन्स सेवेमुळे ‘आरोग्यदायी झेप’ घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा करताना दिलेली आकडेवारी वस्तुस्थितीला धरून नाही. ऑगस्ट 2017 रोजी मुंबईत 10 बाईक अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे ही सेवा सुरू करण्यात आली आणि त्यानंतर मेळघाट, पालघर, गडचिरोली या दुर्गम भागातही सेवेचा विस्तार करण्यात आला. पण सरकारचा कालावधी संपत आला तरीही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचेच सांगितले आहे.
पालघर, मेळघाटमध्ये 10 बाईक्समध्ये सुरू करण्यात आलेली सेवा तर वर्षभरातच कर्मचारी वर्ग नसल्यामुळे बंद करण्याची नामुष्की ओढवली असल्याची माहिती आहे. परंतु आरोग्य विभागाला त्याचा पत्ताच नाही.
2014 ते 2019 या कालावधीमध्ये 33 लाख रुग्णांना या बाईक अ‍ॅम्ब्युलन्स सेवेचा लाभ झाल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात 30 बाईक अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे 33 लाख रुग्णांना फायदा, हा दावाच हास्यास्पद आहे. त्यातही ही सेवा ऑगस्ट 2017 पासून सुरू झाली असताना 2014 पासून सुरू झाली, हे कशाच्या आधारावर सांगितले आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभागाचे मंत्री शिवसेनेचे आहेत आणि शिवसेनेच्या मुखपत्रातून प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतही खोटी माहिती देण्यात आली आहे. आरोग्यमंत्र्यांचा विभागाच्या कामापेक्षा प्रसिद्धीकडे जास्त कल असावा, त्यामुळेच खोटी व कपोलकल्पित माहिती देऊन न केलेली कामगिरी केली असे सांगण्यासाठी हा खटाटोप केलेला दिसतो आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: