Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नाणार प्रकल्पाचा पुनर्विचार करणार : मुख्यमंत्र्यांचे संकेत
ऐक्य समूह
Wednesday, September 18, 2019 AT 10:57 AM (IST)
Tags: mn2
5राजापूर, दि. 17 (वृत्तसंस्था) : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा नाणार प्रकल्पाचे समर्थन केले आहे. नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प राबवण्याचा सरकार फेरविचार करणार असून या प्रकल्पामुळे 1 लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपण्याची चिन्हे दिसत आहेत.
राजापूर येथे महाजनादेश यात्रेला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. नाणारमध्येच रिफायनरी झाली पाहिजे, हे मी घसा फोडून सांगत होतो. हा ग्रीन रिफायनरी प्रकल्प आहे. मात्र ज्याप्रकारे या प्रकल्पाला विरोध झाला त्यामुळे हा निर्णय थांबवण्यात आला होता. पण इथे आल्यावर तुमचा उत्साह पाहिल्यानंतर या प्रकल्पाची पुन्हा एकदा चर्चा करावी असे मला वाटतंय, असे फडणवीस यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे कोकणातील 1 लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे, असे सांगतनाच आज या प्रकल्पाबात कोणताही निर्णय जाहीर करत नसलो तरी या संदर्भात तुम्हाला पुन्हा एकदा भेटणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी नाणारचा फेरविचार करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिल्याने या प्रकल्पावरून पुन्हा एकदा शिवसेना-भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता आहे तसेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनीही या प्रकल्पाला विरोध केला होता. त्यामुळे ते याबाबत काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले असून विधानसभा निवडणुकीत नाणार प्रकल्प गाजण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: