Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोयना धरणाचे दरवाजे बंद
ऐक्य समूह
Wednesday, September 18, 2019 AT 11:05 AM (IST)
Tags: re1
पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक्स विसर्ग
5पाटण, दि. 17 : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणाच्या दरवाजातून विनावापर सोडण्यात येणारे पाणी मंगळवारी पूर्णपणे बंद करण्यात आले. सध्या केवळ धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 2 हजार 100 क्युसेक्स इतकेच पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणात येणार्‍या पाण्याचे प्रमाणही सरासरी तितकेच असल्याने धरणाची पाणी पातळी समांतर ठेवण्यात सिंचन विभागाला यश मिळत आहे.
धरणात आता एकूण 104.92 टीएमसी पाणीसाठा झाला असून त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 99.92 टीएमसी इतका आहे. सोमवारी धरणाच्या सहापैकी दोन दरवाजे एक फुटांनी वर उचलून त्यातून विनावापर पूर्वेकडे पाणी सोडण्यात येत होते. मात्र पाऊस मंदावला व येणार्‍या पाण्याचे प्रमाणही त्याच पटीत घटल्याने मंगळवारी धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. आता धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 2 हजार 100 क्युसेक्स इतकाच विसर्ग सुरू आहे.  
दरम्यान, आजपर्यंत कोयनानगर येथे 6878, नवजा 7988 व महाबळेश्‍वर येथे 6964 मिलीमीटर एकूण पाऊस पडला
आहे. 105.25 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणार्‍या कोयना धरणात आजच्या घडीला 104.92 टीएमसी पाणीसाठा झालेला
आहे. त्यामुळे वर्षभरातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटला आहे. तर वीजनिर्मितीही अखंडितपणे सुरू राहणार आहे. महाराष्ट्रावरील पाणी आणि विजेचे संकट दूर झाल्याने
चिंता मिटली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: