Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आता सातारकरांचे कंबरडे मोडणार नाही
ऐक्य समूह
Wednesday, September 18, 2019 AT 11:10 AM (IST)
Tags: lo1
ग्रेट सेपरेटरपाठोपाठ सिमेंट काँक्रिट रस्त्याला मंजुरी;
3 मुख्य रस्त्यांसह 13 सेवारस्त्यांचा समावेश
5सातारा, दि. 17 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा शहरातील अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्त्यांकरता 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने आता यापुढे रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आपले कंबरडे मोडणार नसल्यामुळे सातारकरांना दिलासा मिळाला आहे. नियोजित सिमेंट काँक्रिट रस्त्यांमध्ये शहरातील 3 मुख्य रस्त्यांसह 13 सेवा रस्त्यांचा समावेश असल्याची माहिती बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सातारा शहरांमधील रस्त्यांवर ठिकठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्यामुळे नागरिकांना विषेशत: विद्यार्थी-विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना त्याचा नाहक त्रास होत होता. दरम्यानच्या काळात वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पुढाकार घेऊन सातार्‍यात ग्रेड सेपरेटर व्हावा, अशी आग्रही मागणी केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून केली. त्यावर उभय नेत्यांनी ग्रेड सेपरेटरला हिरवा कंदील दाखवत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. पोवई नाक्यावर हे काम प्रथम हाती घेण्यात आले. जवळजवळ साठ टक्के हे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. ग्रेट सेपरेटरचे काम हाती घेतल्यामुळे शहरातील वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. रस्त्यांवर वाहतुकीचा मोठा भार पडल्यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडू लागले.  
गेल्या महिन्यांमध्ये सातारा शहराला सलग काही दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढल्यामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरशः वाट लागली. एक खड्डा चुकवला, की दुसर्‍या खड्ड्यात वाहने आदळू लागली. त्यामुळे वाहनचालकांना कंबरदुखीसारख्या नवीन समस्यांना तोंड द्यावे लागले. शारीरिक व्याधींसह वाहने खड्ड्यात आदळल्यामुळे वाहनांच्या दुरुस्तीवर मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च होऊ लागले. त्यामुळे ‘सातारा शहरातून वाहन चालवणे म्हणजे विकतचे दुखणे घेणे’ अशी मानसिकता सातारकरांची होऊन बसली होती. शहरातील राधिका रोडवर तर वाहन चालवणे म्हणजे एका दिव्याला सामोरे जावे लागणे, असा प्रकार होऊन बसला आहे. गंमत जंमत वाईनशॉपपासून प्रतापसिंह शेती शाळा यादरम्यान रस्त्यांवर केवळ आणि केवळ खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मुसळधार झालेल्या पावसामुळे त्यामध्ये वाढच झाली आहे. अशीच परिस्थिती पंचायत समिती ते झटका मिसळ हाऊस येथील रस्त्याची झाली आहे. सातारा शहर वाहतूक शाखेचे कार्यालय ते राजवाडा हा राजपथ वगळता सातारा शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाल्यामुळे सातारकरांमधून
संतप्त भावना व्यक्त होत होत्या. शांतता कमिटीची बैठक असेल अथवा गणेश उत्सव नियोजन बैठक असेल त्यामध्ये रस्त्यावरील खड्डे हा कळीचा मुद्दा झाला होता.
खड्ड्यांचा मुद्दा वारंवार उपस्थित होऊ लागल्यामुळे श्री. छ. उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी निधी मिळावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातले होते. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने सातार्‍यात आले होते. येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर झालेल्या जाहीर सभेमध्ये त्यांनी सातारा शहरातील अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्त्यांसाठी 50 कोटींचा निधी देण्याची घोषणा करून त्यांनी सातारकरांना सुखद धक्का दिला. येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीची
आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळे प्रत्यक्ष या कामाला सुरुवात होण्यासाठी विधानसभा निवडणुका होण्याची वाट पाहावी लागणार असली तरी आता यापुढे रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आपले कंबरडे मोडणार नाही, या आनंदात सातारकर रमू लागले आहेत. यानिमित्ताने शहरातील 3 प्रमुख आणि 13 सेवा रस्त्यांचे भाग्य उजळणार असून ग्रेड सेपरेटर पाठोपाठ सातारकरांच्या सेवेत 16 सिमेंट काँक्रिटचे रस्ते हजर होणार आहेत.
 भाजप हा घेणारा नव्हे, देणारा पक्ष : धनंजय जांभळे
सातारा शहरातील अंतर्गत सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यासाठी
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निधी संदर्भात प्रतिक्रिया विचारली असता नगरपालिकेचे भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे म्हणाले, मुळात भाजपने हा घेणारा नव्हे तर देणारा पक्ष असल्यामुळे अत्यंत कमी
वेळात या पक्षाला यश मिळाले. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा दौर्‍यावर आले असताना त्यांनी जिल्ह्यातील अपूर्ण
प्रकल्प, रस्ते, कालव्यांची कामे, धरणांची दुरुस्ती यासाठी तब्बल दहा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मुळात मुख्यमंत्रिपदी
देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर गेल्या साडेचार वर्षांमध्ये केंद्र व राज्य शासनाकडून सातारा जिल्ह्याला मिळालेला निधी
पाहता यापूर्वी कोणत्याही सरकारने एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास निधी दिल्याचे पाहायला मिळत नाही, ही बाब ही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: