Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शेअर बाजार 642 अंकांनी कोसळला
ऐक्य समूह
Wednesday, September 18, 2019 AT 11:06 AM (IST)
Tags: mn4
5मुंबई, दि. 17 (प्रतिनिधी) : तेल संकटाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 642 अंकांनी कोसळला आहे. सौदी अरेबियातील तेल कंपनीवर झालेला ड्रोन हल्ला आणि चीनमधील कमकुवत आर्थिक स्थितीचा परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 642.22 अंक म्हणजेच 1.73 टक्के घसरणीसह 36,481.09 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय निर्देशांक असलेल्या निफ्टीतही 185 अंकांची घसरण पाहायला मिळाली. दिवसअखेर 1.69 टक्के घसरणीसह निफ्टी निर्देशांक 10, 817.60 अंकांवर बंद झाला. मुंबई शेअर बाजारातील 27 कंपन्यांच्या समभागात घसरण पाहायला मिळाली तर निफ्टीतील 44 कंपन्यांचे समभाग घसरले. सौदी अरेबियातील मुख्य तेल कंपनीवर करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे तेल संकट चांगलेच गडद झाले आहे. कच्च्या तेलाचे उत्पादन निम्म्यानी घटल्यामुळे किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. जागतिक स्तरावरील निर्देशांकामध्येही घसरण सुरू आहे. आशियाई निर्देशांकही लाल निशाण्यावर आहेत. याचाही परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. शेअर बाजारात घसरण असली, तरी हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंट, इन्फोसिस, गेल, टायटन या कंपन्यांचे समभाग तेजीत होते तर दुसरीकडे टाटा मोटर्स, टाटा मोटर्स डीव्हीआर, टाटा स्टील, अ‍ॅक्सिस बँक, हिरो मोटोकॉर्प, मारुती या कंपन्यांचे समभाग घसरले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: