Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
काँग्रेसची पहिली यादी 20 तारखेला होणार जाहीर
ऐक्य समूह
Thursday, September 19, 2019 AT 10:58 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 18 (वृत्तसंस्था) : एकीकडे भाजप आणि शिवसेनेत युती होणार का? कुणाला किती जागा मिळणार यावरून खल सुरू असतानाच काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रत्येकी 125 जागा आणि घटक पक्षांना 38 जागा जाहीर करून आघाडी घेतली. त्यातच आता काँग्रेसच्या 50 उमेदवारांची पहिली यादी येत्या 20 तारखेला जाहीर होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिल्ली येथे दिली. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीने निवडणूक लढवण्याबाबतीत जोरदार वातावरण निर्मिती केल्याचे चित्र आहे. काँग्रेसच्या छाननी समितीची चौथी बैठक आज दिल्लीत पार पडली. त्यानंतर थोरात यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.
शिवसेना आणि भाजपमधल्या जोरदार इनकमिंगमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला भगदाड पडले असले तरी आघाडीने हार मानलेलीनाही. शिवसेना-भाजपच्या अनेक हायप्रोफाईल मतदारसंघात तगडे उमेदवार देण्याचा काँग्रेसचा प्लॅन असल्याचे थोरात यांनी सांगितले.
राहुल गांधी प्रचारासाठी येणार का?
राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये काँग्रेस पक्ष निवडणुकीला सामोरा जात आहे. राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या कामकाजापासून काहीसे अलिप्त आहेत. केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीलाही ते उपस्थित नव्हते. त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रचारात ते किती अग्रेसर असणार याची उत्सुकता आहे. त्याबाबत विचारले असता थोरात म्हणाले, राहुल गांधींचा कार्यक्रम अजून निश्‍चित झालेला नाही. पण आम्ही त्यांना, सोनिया गांधींना आणि प्रियांका गांधी यांनाही प्रचार करण्यासाठी विनंती केलेली आहे. वरून जसा आदेश येईल तसा कार्यक्रम निश्‍चित होईल. 
काँग्रेसचे कोणकोणते दिग्गज लढणार नाहीत?
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेसाठी दिग्गजांनी मैदानात उतरावे, असा हायकमांडचा आदेश असला तरीही अनेक नेते मैदानात उतरण्यास उत्सुक नाहीत. प्रत्येकाची काही वेगवेगळी कारणे आहेत. नुकतेच खासदारकीची निवडणूक हरलेले मिलिंद देवरा, मुंबई प्रदेशचे माजी अध्यक्ष संजय निरुपम, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार राजीव सातव, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे हे निवडणूक लढवणार नाहीत.
फडणवीस यांच्याविरोधात ‘सरप्राईज’ उमेदवार!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातला उमेदवार तुम्हाला सरप्राईज देणारा असेल, असेही थोरात यांनी विशेषत्वाने नमूद केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: