Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राष्ट्रवादीकडून बीड जिल्ह्यातील पाच उमेदवार घोषीत
ऐक्य समूह
Thursday, September 19, 2019 AT 10:56 AM (IST)
Tags: mn2
5मुंबई, दि. 18 (प्रतिनिधी) : आमदार, खासदार पक्ष सोडून भाजप, शिवसेनेत जात असल्याने बॅकफूटवर गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणूक आक्रमकपणे लढण्याचा निर्धार केला आहेे. त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: मैदानात उतरले आहेत. त्यांनी आज बीड जिल्ह्यातील पाच उमेदवारांच्या नावाची अचानक घोषणा करत सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. सत्ताधारी भाजप-शिवसेनेला टक्कर देण्याच्या हेतूने राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांच्यासह सर्व तुल्यबळ मोहरे मैदानात उतरवले आहेत.
शरद पवार सध्या राज्याच्या दौर्‍यावर असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. बीड जिल्ह्यात आज पवारांनी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी निवडणुकीसाठी बीड जिल्ह्यातील पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यानुसार, परळीतून धनंजय मुंडे, गेवराईतून विजयसिंह पंडित, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगावातून माजी मंत्री प्रकाश सोळंके व केजमधून नमिता मुंदडा राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढणार आहेत.
परळीत भावा-बहिणींमध्ये लढत
भाजप-शिवसेनेच्या आक्रमक राजकारणाला शह देण्यासाठी शरद पवार यांनी अत्यंत काळजीपूर्वक उमेदवारांची निवड केली आहे. परळीतून धनंजय मुंडे निवडणूक लढणार आहेत. हा पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे या ठिकाणी भावा-बहिणीमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी सोडून शिवसेनेचे ‘बंधन’ बांधणार्‍या जयदत्त क्षीरसागर यांना शह देण्यासाठी शरद पवार यांनी खेळी करत त्यांच्या विरोधात त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या ठिकाणीही चुरशीची लढत होणार आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: