Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावल्याचा व्हिडिओ समोर
ऐक्य समूह
Thursday, September 19, 2019 AT 11:40 AM (IST)
Tags: na5
5नवी दिल्ली, दि. 18 (वृत्तसंस्था) : पाकिस्तानचे दहशतवादी व घुसखोरांना पाठबळ देण्याचे उद्योग सुरू असून अनेकदा भारताने या विरोधात केलेल्या कारवाईने नुकसान होऊनही पाकिस्तानच्या वर्तवणुकीत सुधारणा होत नसल्याचे दिसत आहे. भारतीय जवानांनी पुन्हा एकादा पाकिस्तानच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीम (बॅट) च्या सैनिकांनी केलेला घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला आहे. 12 व 13 सप्टेंबर रोजी पाकिस्तनकडून हाजीपूर सेक्टरमध्ये हा घुसखोरीचा प्रयत्न केला गेला होता. मात्र भारतीय जवानांनी या घुसखोरांवर ग्रेनेड हल्ले करून त्यांचा खात्मा केला. जवानांच्या या धाडसी कारवाईचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या कुरापती पुन्हा एकदा जगासमोर उघड झाल्या आहेत.
सातत्याने भारताकडून समज देण्यात येऊनही पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरूच आहेत. ‘एलओसी’ वर पाकिस्तानच्या जवळपास 15 घुसखोरांकडून करण्यात आलेला घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला आहे.
काश्मीरमध्ये सुरू असलेल्या ‘ऑपरेशन ऑलआउट’ ने दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडले आहे. जवानांनाकडून पाकिस्तानी ‘बॅट’ च्या घुसखोरांचे प्रयत्न उधळून लावले जात आहेत. कलम 370 हटवण्यात आल्यापासून चवताळलेला पाकिस्तान कायम काहीना काही कुरापती करत आहे. ऑगस्टमध्ये देखील पाकिस्तानकडून एलओसीवर घुसखोरीचा प्रयत्न केला गेला होता, जो भारतीय जवानांनी उधळून लावला होता. विशेष म्हणजे दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास मदत व्हावी म्हणून पाकिस्तानी सेनेकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जाते. हेच कारण आहे, की महिनाभरापासून सीमारेषेवर सातत्याने गोळीबार सुरू आहे. प्रमुख दहशतवाद्यांचा भारतीय जवानांकडून खात्मा करण्यात आल्याने व काश्मीर खोर्‍यातील दहशतवादी कारवायांचा बंदोबस्त केला जात असल्याने पाकिस्तान काहीसा आक्रमक होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच पाकिस्तानातील प्रशिक्षित दहशतवाद्यांना भारतात घुसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी पावसाळ्यात विशेष प्रयत्न केले गेल्याचे दिसून आले आहे. मात्र त्यांचे हे सर्व प्रयत्न भारतीय जवानांनी अपयशी ठरवले आहेत.
काश्मीर खोरे कायम अशांत ठेवण्यासाठी सतत प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानच्या कुरापतींचा व्हिडिओच समोर आल्याने पाकिस्तान आता जगासमोर तोंडघशी पडला आहे. पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपचे कमांडो आणि दहशतवाद्यांच्या या ग्रुपकडे ग्रेनेड लाँचर होते. भारतीय सेनेकडून जारी करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की, कशाप्रकारे पाकिस्तान ‘बॅट’ च्या घुसखोरांना भारतात घुसवण्याचा प्रयत्न करत आहे.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: