Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अयोध्या सुनावणीची डेडलाइन ठरली; नोव्हेंबरमध्ये निर्णय?
ऐक्य समूह
Thursday, September 19, 2019 AT 10:55 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 18 (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीची ‘डेडलाइन’ निश्‍चित करत 18 ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद व सुनावणी पूर्ण व्हायला हवी, असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले आहे. या प्रकरणी मध्यस्थीच्या प्रयत्नांसाठी सुनावणी रोखता येणार नाही. सुनावणीसह मध्यस्थीचे प्रयत्न सुरू ठेवता येऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशातील राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या अयोध्या प्रकरणाचा निकाल नोव्हेंबरमध्ये लागू शकतो, असे मानले जात आहे.      
सरन्यायाधीश गोगोई 17 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यांच्या निवृत्तीपूर्वी या प्रकरणी निकाल सुनावला जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणी दरदिवशी होणार्‍या सुनावणीचा कालावधी एक तास वाढवण्याचा आणि गरज भासल्यास शनिवारीही सुनावणी घेण्यात यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने सुचवले आहे. 18 ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद आणि सुनावणी पूर्ण व्हावी, असे गोगोई यांनी म्हटले आहे. त्यावर 27 सप्टेंबरपर्यंत बाजू मांडली जाईल, असे मुस्लीम पक्षकारांकडून सांगण्यात आले तर युक्तिवाद पूर्ण करण्यासाठी आणखी दोन दिवस लागतील, असे हिंदू पक्षकारांनी सांगितले. ‘आम्हाला मध्यस्थीचे पत्र प्राप्त झाले आहे. मध्यस्थीचे प्रयत्न सुनावणीसह समांतररित्या सुरू ठेवता येऊ शकतात,’ असेही गोगोई यांनी सांगितले. दरम्यान, चर्चेतून या प्रकरणी मार्ग काढण्याचे प्रयत्न करता येऊ शकतात, असे सुन्नी वक्फ बोर्ड आणि निर्वाणी आखाड्याने पत्राद्वारे मध्यस्थी समितीला सांगितले आहे. त्यावर मध्यस्थीचे प्रयत्न सुरू ठेवता येतील, पण सुनावणी सुरूच राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: