Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
रावते काहीच चुकीचे बोलले नाहीत : खा. राऊत
ऐक्य समूह
Friday, September 20, 2019 AT 11:00 AM (IST)
Tags: mn3
5मुंबई, दि. 19 : आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला 144 जागा दिल्या नाहीत तर, युती तुटू शकते, असं विधान करून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री दिवाकर रावते यांनी खळबळ उडवून दिली. रावते यांच्या या भूमिकेचं पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी समर्थन केले आहे. रावते काहीच चुकीचे बोलले नाहीत, असे ते म्हणाले. शिवसेना नेत्यांच्या या भूमिकेमुळे युतीच्या जागावाटपाचा तिढा आणखी वाढला आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर युती आणि आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे. शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सी-खेच सुरू आहे. जागावाटपावर अद्याप दोन्ही पक्षांमध्ये सहमती होऊ शकली नाही. त्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी 144 जागांची मागणी केली आहे. ‘शिवसेनेला 144 जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटू शकते,’ असे रावते म्हणाले. त्यांच्या या विधानाचे खासदार संजय राऊत यांनी समर्थन केले आहे. ‘अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष फिफ्टी-फिफ्टी जागांचा फॉर्म्युला निश्‍चित झाला होता. त्यामुळे रावते जे बोलले त्यात काहीच गैर नाही,’ असे राऊत म्हणाले. निवडणुका सोबतच लढू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभेच्या 288 पैकी पक्षाला किमान 135 जागा हव्या आहेत आणि भाजपनेही तितक्याच जागांवर लढावे. तसेच उर्वरित 18 जागा घटक पक्षांना देण्यात याव्यात, अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे सूत्रांकडून समजते. मात्र, भाजपला हा फॉर्म्युला मान्य नाही. भाजपला शिवसेनेसाठी 120 पेक्षा अधिक जागा सोडायच्या नाहीत   आणि शिवसेनेला ते मान्य नाही, असे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्यानं सांगितले. दुसरीकडे भाजपला शिवसेनेपेक्षा अधिक जागा हव्या आहेत. 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या मतांची टक्केवारी वाढली आहे असे भाजपच्या एका नेत्याचे म्हणणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला 18 जागा जिंकता आल्या. त्यामुळे शिवसेनेपेक्षा भाजपला अधिक जागा मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिकाही या नेत्याने मांडली. शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांच्या भूमिकेमुळे युतीच्या जागावाटपाचा तिढा आणखीनच वाढला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: