Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयावर विश्‍वास ठेवा : मोदी
ऐक्य समूह
Friday, September 20, 2019 AT 10:57 AM (IST)
Tags: mn1
5नाशिक, (वृत्तसंस्था) दि. 19 : अयोध्या राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून न्यायालयावर विश्‍वास ठेवणं गरजेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राम मंदिरासंबंधी वक्तव्यं केली जात आहेत. देशातील सर्व नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान करणं आवश्यक आहे. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना वक्तव्य करणारे कुठून येत आहेत? सर्व प्रकरणात अडथळा का आणला जात आहे ? आपला सर्वोच्च न्यायालय, राज्यघटनेवर, न्याय प्रक्रियेवर विश्‍वास असला पाहिजे. राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयावर विश्‍वास ठेवा, हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली.  नरेंद्र मोदींच्या सभेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या समवेत भाजप चे विविध मंत्री व सातारा लोकसभा मतदारसंघाचे माजी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले नाशिकमध्ये उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना संधी देण्याचं आवाहन केलं.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही नरेंद्र मोदी यांनी टीका केली. जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवण्यावरून टीका केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली आहे. मतांसाठी शरद पवारांकडून काश्मीर मुद्द्यावर अपप्रचार केलं जाणं दुर्दैवी असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. नाशिकच्या सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर जाहीर टीका केली. काँग्रेस गोंधळलं आहे हे समजू शकतो. पण शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता काही मतांसाठी चुकीचं विधान करत असेल तर फार दु:ख होतं. शरद पवारांना शेजारी देश चांगला वाटतो. ही त्यांची इच्छा. तेथील नेते त्यांना कल्याणकारी वाटतात. पण हे संपूर्ण देशाला माहिती आहे, की दहशतवाद्यांची फॅक्टरी कुठे आहे? हिंसाचार, शोषण झाल्याचे फोटो कुठून येतात, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जे सहकार्य करायला हवं होतं ते दिसत नाही. विरोधक म्हणून त्यांनी सरकार, माझ्यावर टीका करणं त्यांचा हक्क. पण राष्ट्रहिताच्या बाबतीत असं बोलणं जे शत्रूसाठी फायद्याचं होईल, त्यावरून भारतावर टीका होणं दुर्दैवी आहे. अशा लोकांना ओळखणं गरजेचं आहे, असंही नरेंद्र मोदींनी म्हटलं.
दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या पंचवटीतील तपोवनात होत असलेल्या जाहीर सभेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेस बाधा पोहोचू नये, यासाठी गुरुवारी सर्व मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्यात आली तसंच कांद्याच्या कोंडीने शेतकरी वर्गात संताप खदखदत असून त्याचा भडका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत उडू नये आणि कांदा हे निषेधाचे हत्यार ठरू नये यासाठी या सभेत कांदा वा अन्य शेतमालाशी संबंधित वस्तूच नव्हे, तर पिशव्यादेखील आणण्यास मनाई करण्यात आली.  
 गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात चांगली गुंतवणूक, शेतकरी, महिलांचा विकास झाला. भटक्या विमुक्त जाती, मागासवर्गीय जनतेला आवाज मिळाला. पूर्ण बहुमत नसतानाही महाराष्ट्रात प्रगतशील सरकार भाजपच्या रूपात मिळालं. गेल्या 60 वर्षांत पहिल्यांदा देशात स्थिर सरकार आलं. हे केवळ फडणवीस सरकारचं रिपोर्ट कार्ड नाही; जनतेने स्थिर सरकारचे फायदे लक्षात घ्यायला हवेत. राजकीय अस्थिरतेमुळे गेल्या 60 वर्षांत महाराष्ट्राच्या प्रगतीला खीळ बसली होती. पण गेल्या पाच वर्षात महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे, असं प्रतिपादन मोदींनी केलं. मोदी म्हणाले, ’जोतिबा फुलेंपासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत कित्येक महापुरुष ज्या महाराष्ट्राने दिले, अशा महाराष्ट्रात कोणतं सरकार, कोणता मुख्यमंत्री सलग पाच वर्षे चालू नये? केवळ दोनच उदाहरणं आहेत एक वसंतदादा आणि दुसरे देवेंद्र फडणवीस. फडणवीसांनी राज्याचं पाच वर्षे सक्षम नेतृत्व केलं आणि महाराष्ट्राला स्थिर सरकार दिलं.’ प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सातारा लोकसभा मतदार संघातील माजी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पगडी घालून सन्मान केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: