Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाकची घुसखोरी उधळली
ऐक्य समूह
Friday, September 20, 2019 AT 11:03 AM (IST)
Tags: na3
बॉम्बवर्षाव पाहताच पाकिस्तान सैनिकांचे पलायन
5श्रीनगर, (वृत्तसंस्था) दि. 16 : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार झाल्यावर पाकिस्तान सातत्याने स्वतःचे सैनिक आणि दहशतवाद्यांना भारतात घुसविण्याचा प्रयत्न करत आहे. 12-13 सप्टेंबर रोजी पाकच्या बॅटने (बॉर्डर ऍक्शन टीम) पीओकेतून काश्मीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला असता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात भारतीय सैनिकांनी त्यांच्यावर बॅरल ग्रेनेड लाँचरद्वारे बॉम्बवर्षाव करत ठार केले आहे.
सैन्य विषयक यंत्रणेने या घटनेची एक चित्रफित प्रसारित केली आहे. यात दहशतवाद्यांवर बॉम्बवर्षाव केला जात असल्याचे दिसून येते. स्पेशल सर्व्हिस ग्रूपच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सैन्याने पीओकेच्या हाजीपीर सेक्टरमध्ये बॉम्ब डागले आहेत.
भारतीय सैन्याने ऑगस्टमध्ये पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे 15 प्रयत्न हाणून पाडले आहेत. मागील महिन्यात बॅटच्या पथकाने केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला होता. पण भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत 5-7 दहशतवादी मारले गेले होते. 4 पाकिस्तानी सैनिकांच्या मृतदेहांची छायाचित्रे प्रसारित करण्यात आली होती.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या एसएसजी कमांडो फोर्सचे पूर्ण समर्थन प्राप्त होतेय. जैशचे दहशतवादी काश्मीरमध्ये मोठा हल्ला घडवून आणण्याचा कट रचत आहेत. पीओकेतील अनेक   प्रशिक्षण तळ पाकने पुन्हा सक्रिय केले आहेत.
नियंत्रण रेषेनजीकच्या पाकिस्तानी चौकीनजीक पाकच्या एएसजी कमांडोंनी ठाण मांडले होते, पण भारतीय सैन्याला पाहताच त्यांनी चौकी सोडून पळ काढला आहे.  चौकीनजीक एक कॅमेरा हस्तगत झाला असून त्याच्या चित्रणात पाकिस्तानी कमांडो दिसून येत आहेत. पुंछ नदीनजीक पाकिस्तानी कमांडोंच्या हालचाली दिसून आल्या होत्या, पण त्यांना हुसकावून लावण्यात आल्याचे भारतीय सैन्याने म्हटले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: