Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
इस्रोने चंद्राच्या कक्षेत फिरणार्‍या ऑर्बिटरबद्दल दिली महत्त्वाची माहिती
ऐक्य समूह
Friday, September 20, 2019 AT 11:13 AM (IST)
Tags: na3
 5नवी दिल्ली, दि. 19 (वृत्तसंस्था) : चांद्रयान-2 मोहिमेत पाठीशी उभे राहिल्याबद्दल देशवासीयांचे आभार मानल्यानंतर इस्रोने आज ऑर्बिटरच्या प्रकृतीची माहिती दिली. ऑर्बिटरच्या पेलोडवर करण्यात आलेले प्रारंभिक प्रयोग यशस्वी ठरले आहेत. सर्व पेलोडसची कामगिरी समाधानकारक आहे असे इस्रोने ट्विटमध्ये म्हटले आहे.
चांद्रयान-2 चा ऑर्बिटर ठरल्याप्रमाणे सर्व वैज्ञानिक चाचण्या करत आहे. ऑर्बिटरमध्ये आठ अत्याधुनिक पेलोड आहेत. ज्यावरुन चंद्राचा नकाशा तयार करण्यात येईल तसेच चंद्रावर पाणी, बर्फ, खनिजांचा शोध घेतला जाईल. विक्रम लँडरबरोबर संपर्क का तुटला? ते शोधून काढण्यासाठी इस्रोच्या तज्ञांची समिती त्यावर काम करत असल्याची माहिती ट्विटमधून देण्यात आली आहे.
ऑर्बिटरला चंद्राच्या आणखी जवळ नेणार ?
चांद्रयान-2 मोहिमेतील लँडरशी संपर्क तुटला असला तरी चंद्राच्या कक्षेत फिरत असलेला ऑर्बिटर निर्णायक ठरेल असा विश्‍वास काही दिवसांपूर्वी इस्रोचे प्रमुख सिवान यांनी व्यक्त केला होता. ऑर्बिटरचे वाढलेले आयुष्य चांद्रयान-2 मोहिमेच्या पथ्यावर पडणारे असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. आधी ऑर्बिटरचे आयुष्य एक वर्ष  असणार होते. पण जीएसएलव्ही प्रक्षेपकाने ऑर्बिटरला अचूक कक्षेत प्रस्थापित केले तसेच त्यामध्ये इंधन जास्त असल्यामुळे ऑर्बिटर आणखी सात वर्ष कार्यरत रहाणार आहे. पाण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण शोध ऑर्बिटरच्या माध्यमातून लागू शकतो. ऑर्बिटरमुळे चंद्रावर बर्फ आणि पाणी शोधून काढण्याची संधी आहे. चंद्राच्या पृष्ठभागाखाली 10 मीटरपर्यंत गोठलेले पाणी पाहण्याची क्षमता आमच्याकडे आहे. आपण इतिहास घडवू असा विश्‍वास सिवन यांनी व्यक्त केला. ऑर्बिटरची कक्षा बदलून त्याला चंद्राच्या आणखी जवळ नेण्याचा इस्रोमध्ये विचार सुरु असल्याचे एका वैज्ञानिकाने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: