Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राजू शेट्टी विधानसभा निवडणूक लढवणार
ऐक्य समूह
Friday, September 20, 2019 AT 10:58 AM (IST)
Tags: mn2
शिरोळ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा घटक पक्षांचा आग्रह
5मुंबई, दि. 19 : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आघाडीतील घटक पक्षांकडून त्यांना आग्रह होत आहे.
राजू शेट्टी देखील निवडणूक लढवण्यास तयार आहेत. नुकतेच त्यांनी चंद्रकांत पाटील निवडणूक लढवणार असतील तर मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य केले होते. चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवली नाही तरीही शिरोळमधून निवडणूक लढवण्याचा शेट्टी यांचा विचार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, आघाडीच्या घटक पक्षांची बैठक आज मुंबईत झाली. घटक पक्षांनी काँग्रेस, राष्ट्रवादीकडे 55 ते 60 जागांची मागणी केली आहे. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादीने घटक पक्षांसाठी 38 जागा सोडल्या आहेत. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादीचा हा प्रस्ताव घटक पक्षांना मान्य नाही. 55 ते 60 जागांचा प्रस्ताव घेऊन घटक पक्षाचे नेते काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटणार असल्याची माहिती आहे. राजू शेट्टी हेच घटक पक्षांचे नेतृत्व करणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.
नुकतेच राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका करताना विधानसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते.  जर चंद्रकांत पाटलांनी ग्रामीण भागात दुसर्‍याच्या मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवली तर मग मात्र मी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढणार असे राजू शेट्टी यांनी ठणकावले होते.  शेट्टी म्हणाले होते की, आगामी विधानसभा निवडणूक स्वाभिमानी पक्ष लढवणार आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मतविभाजन टाळण्यासाठी सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडी निर्माण करावी अशीच भूमिका स्वाभिमानी संघटनेची आहे असेही शेट्टी म्हणाले होते.  या महाआघाडीमध्ये बहुजन वंचित आघाडीने सुद्धा यावे असेही शेट्टी यावेळी म्हणाले होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: