Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भाजपच्या नगरसेवकासह त्याच्या पत्नीला बेदम मारहाण
ऐक्य समूह
Friday, September 20, 2019 AT 11:12 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 19 : ओढ्याच्या संरक्षक भिंतीच्या श्रेयवादावरून सातारा नगरपालिकेच्या भाजपच्या एका नगरसेवकासह त्याच्या पत्नीला भाजपच्याच एका महिला नगरसेविकेसह त्याच्या पतीने बेदम मारहाण केल्याची चर्चा आज सातार्‍यात जोरदार झडत होती.
याबाबत समजलेली माहिती अशी की, येथील मंगळवार पेठेत असणार्‍या कुरेशी मशिदी नजीक असणार्‍या एका ओढ्याला संरक्षक भिंत घालण्याचे काम सुरू आहे. आज सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास त्याच प्रभागातील भाजपचा एक नगरसेवक काम सुरू असणार्‍या ठिकाणी गेला. त्याने कामाचे फोटो काढून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकले. याबाबतची माहिती संबंधित प्रभागातील भाजपच्या दुसर्‍या महिला नगरसेविकेसह तिच्या पतीला समजल्यानंतर ते तत्काळ काम सुरू असणार्‍या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी ग्रुपवर फोटो टाकलेला भाजपचा नगरसेवक उपस्थित होता, उभय नगरसेवक व तिच्या पती दरम्यान त्या ठिकाणी श्रेयवादावरून शिवीगाळ सुरू झाली. नंतर संबंधित तेथीलच एका घरात चर्चा करण्यासाठी गेले असता वाद वाढून भाजपच्या नगरसेवकाला तेथे मारहाण झाली. याबाबतची माहिती मिळताच मारहाण झालेल्या भाजपच्या नगरसेवकाची पत्नी घटनास्थळी दाखल झाली. तिने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तिलाही मारहाण झाल्याची जोरदार चर्चा सातारा शहरात झडत आहे. 
 याबाबतची माहिती मिळताच काही सुज्ञ नगरसेवक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यानच्या काळात मार खाल्लेल्या भाजप नगरसेवकाने पोलिसात तक्रार करण्याचा पवित्रा घेतला. तेथे उपस्थित असणार्‍या सुज्ञ नगरसेवकांनी दोघांमध्ये समेट घडवून आणत घरातील भांडण घरात ठेवा, असा सल्ला दिल्यामुळे हे प्रकरण मिटवण्याचा निर्णय उभय नगरसेवकांनी घेतल्याचे सांगितले जात आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: