Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
लोकसभेपूर्वीच युतीचा फॉर्म्युला ठरलाय
ऐक्य समूह
Saturday, September 21, 2019 AT 11:06 AM (IST)
Tags: mn2
5मुंबई, दि. 20 (प्रतिनिधी) : ‘युतीचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या वेळीच ठरलेला आहे. युतीमध्ये कुठलाही तिढा नाही. येत्या एक ते दोन दिवसात युतीची घोषणा होईल,’ अशी माहिती शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
भाजपवर नाराज असलेले विदर्भातील शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्या प्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप-शिवसेना युतीबाबतच्या अनेक प्रश्‍नांना उत्तरं दिली. ‘नाणारचं जे काही व्हायचं आहे, ते आधीच झालेलं आहे. ‘आरे’बाबतची शिवसेनेची भूमिका लोकभावनेला धरूनच आहे. त्यामुळे युतीमध्ये गोंधळण्यासारखे काही नाही,’ असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
सन्मानजनक जागा मिळाल्या तरच!
तत्पूर्वी, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे नेते व मंत्र्यांशी युतीच्या जागावाटपाच्या संदर्भात सुमारे तासभर चर्चा केली. ‘चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. युती होईल, अशी परिस्थिती आहे. मात्र, सन्मानजनक जागा मिळाल्या तरच त्यावर शिक्कामोर्तब होईल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे संभ्रम वाढला आहे.
शिवसेना-भाजपमध्ये 126-162 जागांचा फॉर्म्युला ठरला असून शिवसेना त्यावर समाधानी आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आजची बैठक बोलावली होती. पण शिवसेनेला हव्या असलेल्या सन्मानजनक जागा म्हणजे नेमक्या किती जागा, हे मात्र कळू शकलेले नाही.
फॉर्म्युला ठरलेला
नाही : चंद्रकांत पाटील
भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी युतीचा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरला नसल्याचे सांगितले. भाजपची निवडणूक समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी 100 टक्के युती होईल, मात्र युतीचा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही, असे सांगितले. तसेच युतीचा निर्णय मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच भाजप आणि शिवसेना युतीची घोषणा होण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. 22 सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत असून यावेळी युतीची घोषणा केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. चंद्रकांत पाटील यांनी मात्र याबाबत अधिकृतपणे काही सांगितले नाही. युतीची जेव्हा घोषणा होईल तेव्हा सोबत जो कोणी केंद्रीय मंत्री असेल ते पत्रकार परिषदेत असतील, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान शिवसेना-भाजपमध्ये 126-162 जागांचा फॉर्म्युला ठरला असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. शिवसेना 126 जागांवर लढणार असून भाजप आणि मित्रपक्षांसाठी 162 जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे.  
शिवसेना भवनवर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीसंबंधी चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. शिवेसनेचे सचिव अनिल देसाई यांनी 100 टक्के युती होईल, असा विश्‍वास व्यक्त केला. यावेळी बोलताना अनिल देसाई यांनी निवडणुकीच्या तयारीचा पूर्वभाग म्हणून बैठक बोलावण्यात आली असल्याचे सांगितले. यावेळी अनिल देसाई यांनी समाधानी असल्याशिवाय पुढे जाणार नाही, असेही स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात चर्चा होऊन युतीचा निर्णय घेतला जाईल. सध्या किती जागा लढणार आहोत यासंबंधी आपण सांगू शकत नाही. सध्या अंतिम चर्चा सुरु आहे. चर्चा सकारात्मक सुरु असून युती होईल. पण समाधानी असल्याशिवाय पुढे जाणार नाही, असे अनिल देसाई यांनी स्पष्ट केले आहे. रविवारी अमित शहा यांच्या मुंबई दौर्‍यात किंवा त्यापूर्वी युतीची घोषणा होईल, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांचा तो टोला माझ्यासाठी नाही !
राममंदिराच्या मुद्द्यावरून काही जण बोलघेवडेपणा करत असल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधील सभेत लगावला होता. त्याबद्दल विचारले असता, तो टोला माझ्यासाठी नव्हता. मी राममंदिराबाबत कधीच बोलघेवडेपणा केला नाही. मी केवळ तमाम हिंदूंच्या भावना व्यक्त केल्या. आता जर पंतप्रधान म्हणत असतील, की न्यायालयात हा विषय आता अंतिम टप्प्यात आहे. न्यायालयाच्या निकालाची वाट पाहूयात तर त्यांची ही विनंती रास्तच आहे. कारण न्यायालयच निष्पक्ष असा निवाडा करत असते असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सरकारच्या यशात आमचाही वाटा !
सरकार बहुमतात नसतानाही राज्यात स्थिर सरकार चालवून दाखविले असेही पंतप्रधान मोदी नाशिकच्या सभेत म्हणाले होते. याकडे लक्ष वेधता, शिवसेनेने पाच वर्षांत सरकारला कधीच दगा दिला नाही. सुरूवातीच्या काळात मंत्र्यांनी राजीनाम्याचा विषय काढला होता. पण तो केवळ सुरूवातीला होता. शिवसेनेचा पाठिंबा हा केवळ सरकारलाच नव्हता तर विधायक कामांना होता. विकासकामांमध्ये शिवसेनेचेही श्रेय आहेच असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: