Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नाठाळ बैलांना मतदानाच्या दिवशी बाजार दाखवा
ऐक्य समूह
Saturday, September 21, 2019 AT 11:21 AM (IST)
Tags: mn5
5जालना, दि. 20 (वृत्तसंस्था) : एकदा काय उन्हाळा आला तर पक्ष बदलूंनी पळापळी सुरू केली आहे. या सार्‍यांचा विकास आपण मिळून करू. जास्त दिवस राहिले नाहीत. बैलजोडीत काही बैलं नाठाळ असतात. नांगरणी करताना काही बैल वाकडे चालतात. मग आपण त्यांच्या जागेची अदलाबदल करतो. तरी तो नाठाळ बैल तसाच वागला तर त्याला आठवड्याचा बाजार दाखवतो. आज हे बैल तसेच झाले आहेत. मतदानाच्या दिवशी यांना बाजार दाखवा, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करणार्‍या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. गडचिरोलीत पूर आला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेत व्यस्त आहेत. त्यांना रात्री झोप तरी कशी लागते? असा सवाल त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी पक्षांतर करणार्‍या नेत्यांवर टीका करतानाच भाजपवरही जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी सरकारच्या नाकर्तेपणाबद्दल चिंताही व्यक्त केली. काही जण आज पक्ष सोडून जात आहेत. मराठवाड्यातील काही नेते सोडून गेले आहेत. आम्हाला विकास करायचा आहे, असे म्हणत हे पक्षांतर सुरू आहे. अरे, तुम्हाला इतकी वर्षे सत्ता दिली तेव्हा काय केले? या जनतेने मोठे केले, पक्षाने हवे ते दिले. तरी गद्दारी करता? आजचा तरूण शांत आहे. उद्या ही तरूण मंडळी संतप्त झाली तर हे सरकार उलथवून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. या सरकारने राज्यात सुशिक्षित बेरोजगारांची फौज उभी केली आहे. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांचे निर्णय आणि धोरणे चुकली आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याला फटका बसला आहे. राज्य मोठ्या संकटात आहे. त्यामुळे याची नोंद घेऊन आपल्याला पुढची भूमिका ठरवायची आहे, असे खा. पवार यांनी सांगितले.  लेका, हवाई दौरा कसा करतो?
राज्यासमोर शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा मोठा प्रश्‍न आहे. राज्यात 16 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. बळीराजाच्या डोक्यावर मोठे कर्ज आहे. शेतमालाला भाव नसल्यामुळे तो आत्महत्या करत आहे. सरकार याची दखल घेत नाही. कोल्हापूर, सांगली, सातारा येथे महापूर आला. त्यात लोकांचे मोठे नुकसान झाले. सोन्यासारखी पिके बरबाद झाली. मुख्यमंत्र्यांनी त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. मुख्यमंत्र्यांनी हवाई पाहणी केली. लेका, त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला तू हवाई दौरा कसला करतो, असा सवाल पवारांनी केला.
मुख्यमंत्र्यांना झोप कशी लागते?
आमच्या कार्यकाळात जालन्यात दुष्काळ पडला असता मोसंबीच्या बागांचे मोठे नुकसान झाले. त्यावेळी आम्ही तत्काळ या भागाला निधी दिला. पिकवणारा जगला तर खाणारा जगेल म्हणून आम्ही ती भूमिका घेतली. आजचे राज्यकर्ते तशी भूमिका घेताना दिसत नाहीत. गडचिरोली जिल्ह्यातही महापूर आला आहे, पण मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत व्यस्त आहेत. यांना रात्री झोप कशी लागते, असा सवाल करतानाच सत्ताधार्‍यांना खरा जनादेश देऊन टाका. अशा राज्यकर्त्यांना बदला, असे आवाहनही पवार यांनी केले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: