Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाचगणी पालिकेच्या सभेत अभूतपूर्व गोंधळ
ऐक्य समूह
Saturday, September 21, 2019 AT 11:15 AM (IST)
Tags: re1
5पाचगणी, दि. 20 : विषयपत्रिकेवरील विषय वाचण्याच्या क्रमवारीवरून व अध्यक्ष तथा पीठासन अधिकार्‍यांच्या अधिकारावरून पाचगणी पालिकेची सभा अभूतपूर्व गोंधळात पार पडली.
माजी उपनगराध्यक्ष विनोद बिरामणे यांचा संयम सुटल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा लक्ष्मी कर्‍हाडकर यांनी बिरामणे यांना सभेतून बाहेर काढण्याचा आदेश दिला. यावर सत्ताधारी गटाने जोरदार आक्षेप घेतल्याने आणखी गोंधळ वाढला. पोलीस मध्यस्थी करत असताना बहुमतातील सत्ताधारी गट आणखी आक्रमक झाला. शेवटी विनोद बिरामणे रागारागाने आग ओकतच सभागृहाबाहेर पडले. पाचगणी पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा लक्ष्मी कर्‍हाडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्षा आशा बगाडे, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, विठ्ठल बगाडे, विनोद बिरामणे, नारायण बिरामणे, पृथ्वीराज कासुर्डे, दिलावर बागवान, प्रवीण बोधे, विजय कांबळे, रेखा कांबळे, सुलभा लोखंडे, हेमा गोळे, सीमा कासुर्डे, रेखा जानकर व उज्जवला महाडिक आदी नगरसेवक उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीस विषयपत्रिकेवरील पहिला विषय वगळून दुसरा विषय वाचण्याची सूचना नगराध्यक्षांनी पालिका लिपिकास दिली. यावर विनोद बिरामणे, नारायण बिरामणे, अनिल वन्ने, पृथ्वीराज कासुर्डे कमालीचे आक्रमक झाले. यावरून नगराध्यक्षा कर्‍हाडकर यांनी नगरपालिका अ‍ॅक्ट सभागृहाला वाचून दाखवून विषयांचा क्रम ठरवण्याचा अधिकार पीठासन अधिकार्‍यांचा असल्याचे सभागृहास  ठामपणे सांगितले. आपण कुठलाही विषय टाळणार नाही पण आचारसंहिता लागण्याच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी गटाने सुचवलेले, तसेच पालिका प्रशासनाने सुचवलेले विषय मंजूर करून आपण पहिला विषय घेऊया अशी यामागची भूमिकाही कर्‍हाडकरांनी सभेपुढे मांडली. यावर विनोद बिरामणे यांचा पारा कमालीचा चढला.
मागील विषय वाचून कायम केल्याशिवाय, इतिवृत्त वाचल्याशिवाय पुढचा विषय घ्यायचा नाही, ही हुकूमशाही व मनमानी चालणार नाही. थेट नगराध्यक्ष झालाय,  महिला आहात म्हणून  दादागिरी चालणार नाही असा आक्रमक पवित्रा बिरामणे यांनी घेतली. नारायण बिरामणे, अनिल वन्ने, पृथ्वीराज कासुर्डे आदी सर्वजण यात सामील होते. पण विनोद बिरामणे यांचा पारा कमालीचा चढत गेला. त्यांनी मोठमोठ्या आवाजात या निर्णयाला विरोध केला. चुटक्या वाजवत, हातवारे करत, टेबलवर हात आपटून बिरामणे यांनी आपला राग व्यक्त करायला सुरुवात केली. बिरामणे यांची आक्रमकता पाहून नगराध्यक्षांनी त्यांना नियम दाखवायला सुरुवात केल्याने बिरामणे  चिडले. शब्दाने शब्द वाढत गेला. याचवेळी नगराध्यक्षांनी बिरामणे यांनी गैरवर्तवणूक केल्याने पोलिसांकडे बिरामणे यांनी माफी मागावी अन्यथा सभागृहातून बाहेर जावे असा आदेश दिला. यावर बिरामणे यांच्या सहकारी सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. बिरामणे यांनी मी माफी मागणारच नाही असा हट्ट धरला तर माफी मागणार नसाल तर सभागृहाबाहेर व्हा असा हट्ट नगराध्यक्षांनी धरला. पोलिसांनी त्यांना बाहेर काढावे अशी मागणी कर्‍हाडकरांनी उपस्थित पोलिसांकडे केली. पोलीस सभागृहात यायला लागल्यावर महिला सदस्यांनी पोलिसांना उद्देशून कोण हात लावतंय ते बघूच अशी निर्वाणीची भाषा वापरत पोलिसांना आव्हान देण्यास सुरुवात केली. त्यांनी काही गुन्हा केला नाही, असा पवित्रा घेत बिरामणे यांचे समर्थन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आणखी गोंधळ वाढला. बिरामणे यांना सभागृहातून बाहेर काढल्याशिवाय सभा सुरू होणार नाही असा आक्रमक पवित्रा नगराध्यक्षांनी घेतला. यामुळे प्रकरण आणखी चिघळले. विनोद बिरामणे यांचे रौद्ररूप पाहून पोलिसांची आणखी कुमक दाखल झाली. शेवटी, विनोद बिरामणे यांनी सत्ताधारी सहकार्‍यांचा विरोध डावलून माफी न मागता सभात्याग केला. यानंतर सभा सुरू झाली पण पुन्हा त्याच मुद्द्यांवर वादही सुरूच राहिला. विजय कांबळे यांनी नगराध्यक्षांना मुद्दाम वाद वाढवायचा आहे, असा आरोप केला. आम्हीही जनतेतून निवडून आलोय. तुम्ही लोकानियुक्त नगराध्यक्ष झालात म्हणून काय आभाळातून पडलात का? असा आरोप नगराध्यक्षांवर केला. यामुळे पीठासन अधिकारी प्रचंड संतापल्या. मला अपशब्द वापरल्याबद्दल विजय कांबळे यांनी 5 मिनिटात माझी माफी मागावी अन्यथा त्यांनी सभागृहातून बाहेर जावे, असा आदेशच कर्‍हाडकरांनी दिला. सत्ताधारी गट कमालीचा आक्रमक झाला. विठ्ठल बगाडे यांनी यावर आक्षेप घेत विजय कांबळे बेशिस्त वागला नाही. त्यामुळे त्यांनी माफी मागण्याचा प्रश्‍नच नाही. तुम्ही नगरसेवकांवर दादागिरी करणार का? दरवेळी पुस्तक वाचून दाखवताय का असा प्रश्‍न केला. आम्ही पण 3-4 टर्म काढल्या आहेत असा आक्रमक पवित्रा घेतल्याने कर्‍हाडकर यांनी बगाडे यांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखला. त्यामुळे कांबळे यांच्या माफीनाम्याचा विषय थांबला. यानंतर चहापान झाले त्यावेळी मुख्याधिकारी अमिता दगडे- पाटील यांनी दोन्ही गटांची समजूत काढून पुन्हा सभेला सुरुवात केली. यावेळी नगराध्यक्ष आणि दोन्ही गटांनी समजुतीची भूमिका घेतली. पहिला विषय घेतल्याशिवाय सभा संपणार नाही असा शब्द पीठासन अधिकारी कर्‍हाडकर यांनी  दिला. त्यामुळे विषयपत्रिकेवरील 2 नंबरचे 51 विषय बहुमताने मंजूर करण्यात आले. कर वाढीसंदर्भातील विषयात दोन्ही गटांनी शहर- वासीयांच्या बाजूने प्रशासनाकडे दाद मागत करवाढ होऊ नये, अशी भूमिका घेतली. मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्यावरूनही या सभेत गोंधळ झाला. शेवटी तब्बल सहा तासांच्या कालावधीनंतर ही सभा पार पडली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: