Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपातीचा सरकारचा निर्णय
ऐक्य समूह
Saturday, September 21, 2019 AT 11:04 AM (IST)
Tags: mn1
5गोवा, दि. 20 (वृत्तसंस्था) : मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि उद्योग क्षेत्राला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने आज महत्त्वाची घोषणा केली. कंपनी करात कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गोव्यातील पत्रकार परिषदेत दिली. कोणत्याही प्रकारची सवलत न घेणार्‍या कंपन्यांच्या करामध्ये कपात करून दर 22 टक्के करण्यात आला आहे.
उद्योग क्षेत्राला उभारी देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. उत्पादन आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात केलेल्या बदलांची अंमलबजावणी या आर्थिक वर्षापासून करण्यात येणार असून कोणतीही सवलत न घेणार्‍या भारतीय कंपन्यांना 22 टक्के कर द्यावा लागेल आणि अधिभार आणि सेस मिळून एकूण 25.17 टक्के कर द्यावा लागेल.
‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन
केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या घोषणेला बळ देण्यासाठी सरकारने प्राप्तिकर कायद्यात तरतूद केली आहे. चालू आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 1 ऑक्टोबरनंतर उत्पादन प्रक्रियेत गुंतवणूक करणार्‍या भारतीय कंपन्यांकडे 15 टक्के दरापासून प्राप्तिकर भरण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. म्हणजेच 1 ऑक्टोबर 2019 किंवा त्यानंतरच्या भारतीय कंपन्यांना 15 टक्के कर भरावा लागेल. 31 मार्च 2023 पूर्वी उत्पादन घेण्यास सुरुवात केली तर 15 टक्के कर भरावा लागेल. सर्व प्रकारचे अधिभार आणि सेस मिळून एकूण 17.10 टक्के प्रभावी दर आकारला जाणार आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: