Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बलात्कार प्रकरणी चिन्मयानंद यांना 14 दिवसांची कोठडी
ऐक्य समूह
Saturday, September 21, 2019 AT 11:20 AM (IST)
Tags: mn4
5शहाजहानपूर, दि. 20 (वृत्तसंस्था) :  बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेले माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. चिन्मयानंद यांना शाहजहानपूर तुरुंगात ठेवण्याचे आदेश स्थानिक न्यायालयाने दिले आहेत.
शहाजहानपूर येथे चिन्मयानंद यांचे लॉ कॉलेज आहे. याच कॉलेजमधील एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा व तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप चिन्मयानंद यांच्यावर आहे. हा आरोप झाल्यानंतर उत्तर प्रदेशात मोठा राजकीय गदारोळ झाला होता. चिन्मयानंद निर्दोष असल्याचे सांगत त्यांचे  पाठीराखे रस्त्यावर उतरले होते. मात्र, पीडित विद्यार्थिनीनेही माघार न घेता या संदर्भातले अनेक व्हिडिओ जाहीर केले होते. त्यानंतर चिन्मयानंद यांना अटक करण्याच्या मागणीने जोर धरला होता. चिन्मयानंद यांना अटक न झाल्यास आत्महत्या करण्याची धमकी पीडित मुलीने दिली होती. हे प्रकरण चिघळणार असे दिसताच चक्रे फिरली आणि आजअखेर अटकेची कारवाई झाली. अटकेनंतर आज लगेचच त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
कारवाईला उशीर झालेला नाही : डीजीपी
चिन्मयानंद यांना अटक करण्यात दिरंगाई झाल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक ओ पी सिंह यांनी फेटाळला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. चौकशीनंतरच ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी कुठलीही दिरंगाई झालेली नाही, असे सिंह यांनी सांगितले. चिन्मयानंद यांना ब्लॅकमेल करणार्‍या तीन पोलिसांनाही अटक करण्यात आली आहे.
      
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: