Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
व्यायामाला गेलेल्या तीन युवकांना कंटेनरने चिरडले
ऐक्य समूह
Tuesday, September 24, 2019 AT 11:18 AM (IST)
Tags: re4
5कराड, दि. 23 ः कराड-तासगाव रस्त्यावर भवानीनगर दरम्यान शेणोली, ता. कराड येथील व्यायामाला गेलेल्या तीन युवकांना कंटेनरने चिरडल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. यामध्ये तीन युवक जागीच ठार झाले. तर रस्त्यालगत व्यायाम करत असलेला एक जण या घटनेत सुदैवाने बचावला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थ, प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती.
विशाल धोंडिराम गायकवाड, प्रवीण हिंदुराव गायकवाड व दीप ज्ञानू गायकवाड अशी जागीच ठार झालेल्यांची नावे आहेत. तर रोहित आनंदराव गायकवाड (सर्व रा. सम्राटनगर, शेणोली) हा या घटनेत बचावला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की कराड-तासगाव रस्त्यावर शेणोली-भवानीनगर दरम्यान पहाटेच्या सुमारास विशाल, प्रवीण, दीप व रोहित हे युवक नेहमीप्रमाणे व्यायामासाठी गेले होते. 
सोमवारी  23 रोजी शेणोली गावानजीक रस्त्यावरून जाणार्‍या भरधाव कंटेनरने यातील विशाल गायकवाड, प्रवीण गायकवाड व दीप गायकवाड या तिघांना चिरडले. त्यामध्ये ते जागीच ठार झाले. तर याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला व्यायाम करत असलेला रोहित गायकवाड हा या घटनेत सुदैवाने बचावला.
दरम्यान, घटनास्थळानजीक असलेल्या वस्तीतील लोकांनी या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर धाव घेतली. मात्र, या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे शेणोली गावासह परिसर व तालुक्यावर शोककळा पसरली आहे. या तीनही युवकांच्या या अपघाती मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: