Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोयनानगरमध्ये आर्थिक व्यवहारातून सेंट्रिंग व्यावसायिकाचा खून
ऐक्य समूह
Tuesday, September 24, 2019 AT 11:14 AM (IST)
Tags: re2
5पाटण, दि. 23 : कोयनानगर येथे आर्थिक व्यवहारावरून सेंट्रिंग  व्यवसाय करणार्‍या 41 वर्षीय इसमाचा अज्ञात व्यक्तीने गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद कोयनानगर पोलीस ठाण्यात झाली आहे. दरम्यान या खून प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
याबाबत कोयनानगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवार, दि. 21 रोजी कोयनानगर येथील तीन मंदिराच्या पाठीमागे हेळवाक रस्त्यालगत नाल्यात श्रीकांत सुभाष चव्हाण (वय 41), रा. कोयनानगर, मूळ रा. विजापूर (कर्नाटक) या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी मृत्यूदेह पाटण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला असता शवविच्छेदन अहवालात श्रीकांत चव्हाण याचा गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट झाल्याने   कोयनानगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संजय चव्हाण यांनी कोयनानगर पोलीस ठाण्यात श्रीकांत चव्हाण यांचा गळा दाबून खून झाल्याची फिर्याद दाखल केली.
श्रीकांत चव्हाण हा मूळचा विजापूर (कर्नाटक) नमानतांडा येथील आहे. गेल्या काही वर्षापासून चव्हाण हा कोयनानगर येथेच सेंट्रिंग व्यवसाय करत होता. दोन महिन्यांपूर्वीच त्याच्या पत्नीचे निधन झाल्याने चव्हाण आपल्या आई व मुलांना घेऊन कर्नाटकला गेला होता. मात्र शनिवारी अचानक त्याचा मृत्यूदेह आढळून आला व रविवारी त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्याने कोयनानगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मयत श्रीकांत चव्हाण याचा खून आर्थिक व्यवहारातून  झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला. अशी तक्रार त्यांनी कोयनानगर पोलिसात दिली आहे. त्यानुसार कोयनानगर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून या घटनेशी संबंधित दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. लवकरच या खुनाचा तपास करून खुन्यांना गजाआड केले जाईल, अशी माहिती कोयनानगर पोलिसांनी दिली. सहाय्यकपोलीस निरीक्षक महेश भावीकट्टे तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: