Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाकव्याप्त काश्मीरची मुक्तता हेच केंद्र सरकारचे धोरण
ऐक्य समूह
Wednesday, September 25, 2019 AT 11:16 AM (IST)
Tags: re3
5सातारा, दि. 24 : काश्मिरी जनतेत अलगतेची-फुटिरतेची भावना जोपासणारे  कलम 370 केेंद्र सरकारने धाडसाने रद्द तर केले आहेच, पण आता पाकव्याप्त काश्मीरची मुक्तता करुन तो भाग भारतात आणणे हेच सरकारचे पुढील धोरण असल्याचे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. डी. बी. शेकटकर यांनी नुकतेच केले.
ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले आणि वासुदेव कुलकर्णी यांनी लिहिलेल्या गंधर्व वेद प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘कलम 370 आणि 35 अ’ या पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथील निवारा सभागृहात समारंभपूर्वक झाले. या सोहळ्यात ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष खा. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी या पुस्तकाचे लेखक अरविंद गोखले, वासुदेव कुलकर्णी, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, प्रकाशक दीपक खाडिलकर, प्रकाश खाडिलकर उपस्थित होते.
शेकटकर पुढे म्हणाले, काश्मिरी जनतेला आपल्या राजकीय स्वार्थासाठी काही राजकारण्यांनी सातत्याने चिथावण्या दिल्या. काश्मिरी जनतेची सतत दिशाभूल केली. परिणामी, मूठभरांचा स्वार्थ साधला गेला. पण काश्मीरचा विकास झाला नाही.  देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले असले तरी पाच ऑगस्ट रोजी काश्मीरसाठी अस्तित्वात असलेले कलम 370 आणि 35 अ ची घटनेतील तरतूद रद्द केल्याने खर्‍या अर्थाने काश्मीर स्वतंत्र झाले आहे. आता काश्मीर पूर्णपणे भारताशी एकसंध झाले आहे. पाकिस्तानने कितीही वल्गना केल्या तरी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार आणि भारतीय लष्कराकडून योग्य ती तयारी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
याच घातक कलमाच्या आधारे काश्मीरमध्ये शेख अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला आणि मुफ्ती मोहंमद सईद यांची घराणेशाही चालत होती आणि त्यांना साथ देणारे संधीसाधू पुरोगामी राजकारणी, घराणेशाही चालवणारे पक्षही पाठिंबा देत होते. त्यांनीच हे कलम रद्द करायला कडाडून विरोध केल्याचे परखडपणे सांगत सहस्त्रबुद्धे यांनी आता हे कलम पूर्णपणे रद्द झाल्याने खर्‍या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता आणि भारताची एकात्म संघराज्याची संकल्पना साकार झाली आहे. महाराष्ट्रातला एक पक्ष हंगामानुसार नावे बदलतो. आता हा पक्ष स्वत:ला राष्ट्रवादी समजतो. या पक्षाने काश्मीरबाबतच्या केंद्र सरकारच्या धोरणाला राष्ट्रहितासाठी पाठिंबा द्यायला हवा होता. पण, या पक्षाला राजकीय स्वार्थ महत्त्वाचा वाटतो. जनताच या पक्षाला चोख प्रत्युत्तर देईल. या कलमामुळे काश्मीर अविकसीतच कसे राहिले याची उदाहरणेही त्यांनी आपल्या भाषणात दिली. कलम 370 या महत्त्वाच्या विषयावरील हे पुस्तक दोन मराठी पत्रकारांनी एकत्र येवून पूर्ण केले, हा देशाच्या इतिहासातील दुर्मीळ योगच म्हणावा लागेल असेही त्यांनी सांगितले.
कलम 370 मुळे देशाच्या एकतेलाही धोका होता, पण यापूर्वीचे राज्यकर्ते मात्र, जनतेला चुकीची माहिती देत होते. आता हे कलमच रद्द झाल्याने काश्मीरचा प्रश्‍न कायमचा सोडवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार नक्कीच भक्कम पावले उचलील असे सांगून अविनाश धर्माधिकारी म्हणाले, हे कलम रद्द झाल्याने पाकिस्तान पिसाळणे स्वाभाविक होते. पण आता पाकिस्तानने कितीही धमक्या दिल्या तरी पाकव्याप्त काश्मीरची मुक्तता अटळ आहे.
या पुस्तकाचीही त्यांनी आपल्या भाषणात प्रशंसा केली. प्रारंभी या पुस्तकाचे लेखक गोखले आणि कुलकर्णी यांनी, हे पुस्तक राष्ट्रीय हितासाठीच आणि या कलमाबाबत जनतेत निर्माण केलेले गैरसमज दूर करुन सत्य इतिहास मांडण्यााठीच लिहिल्याचे सांगितले.
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश खाडिलकर यांनी आभार मानले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: