Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्ह्यासह परिसरात नवरात्रोत्सवास जल्लोषात प्रारंभ
ऐक्य समूह
Monday, September 30, 2019 AT 11:12 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि.29 ः आदिशक्ती दुर्गादेवीच्या नवरात्रोत्सवास रविवारपासून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. आश्‍विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेच्या काळाला नवरात्र उत्सव म्हटले जाते. नवरात्रोत्सानिमित्त सातारा, कराड, पाटण, फलटण, वाई  शहरांसह विविध तालुक्यांमध्ये ठिकठिकाणी दुर्गामातेच्या मूर्तींची मनोभावे प्रतिष्ठापना करण्यात आली. शहरासह तालुक्यातील बहुतांश देवीच्या मंदिरात आकर्षक सजावटी व विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.
नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी घरोघरी घटस्थापना केली जाते. आदिशक्ती असलेल्या देवीपुढे अखंड दीप लावला जातो. रात्री देवीपुढे बसून उपासना, जप, ग्रंथवाचन, देवीची भजने, स्तोत्र पठण केले जाते. देवी का आणि कशी प्रकट झाली  याबद्दल देवी महात्म्याचे वाचन केले जाते. देवी महात्म्य या ग्रंथात नमूद केल्याप्रमाणे, पूर्वी पृथ्वीवर ‘महिषासूर’ नावाच्या राक्षसाने फार उन्माद माजवला होता. त्याने देव-देवतांसह ऋषिमुनी, साधू, संत, सज्जन आणि भाविक भक्तांनाही अक्षरश: सळो की पळो करून सोडले होते. यावेळी  सर्वजण ब्रह्मा, विष्णू, महेश या देवतांकडे गेले. त्यांनी आपली समस्या त्या देवांना सांगितली. त्यावेळी देवांना महिषासूर राक्षसाचा क्रोध आला. देवांच्या क्रोधातून एक शक्तिदेवता प्रगट झाली. त्या शक्तिदेवतेने महिषासूराशी नऊ दिवस युद्ध केले आणि त्याला ठार मारले. म्हणूनच त्या देवीचे सर्वांनी नाव ठेवले ‘महिषासूरमर्दिनी’. त्या देवीच्या उपासनेचा काळ म्हणजेच नवरात्र उत्सव.
आश्‍विन शुद्ध प्रतिपदेला देवघरात, मंदिरात घटस्थापना केली जाते. पळासाच्या पानांपासून बनवलेल्या दोन पत्रावळी घेऊन त्यात एक परडी ठेवली जाते. या परडीत काळी माती घेवून त्यात एक सुगड (घट) ठेवतात. त्याला कुंकवाची पाच किंवा सात बोटे काढली जातात. त्या सुगडाच्या तोंडावर नऊ विड्यांची पाने लावतात. त्यावर एक नारळ ठेवतात. त्या श्रीफळालाच देवीचा मुखवटा मानून हळद-कुंकू लावले जाते. हार, वेणी, गजरा घालतात.    घटाखालच्या काळ्या मातीत सात प्रकारची धान्य पेरतात.   या घटाजवळच अखंड नंदादीप लावतात. त्या दिव्याची काळजी घेतली जाते. दीप म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे ज्ञान तसेच या घटावर फुलांच्या माळा सोडल्या जातात.  घटाखालच्या मातीत पेरलेले धान्य हे पाणी आणि अखंड दिव्याची उष्णता याने अंकुरते. हळूहळू वाढू लागते. तेच त्या देवीचे घटावरील दर्शन मानले जाते. सातारा शहरातील सम्राट मंडळ, भवानी मंडळ, प्रतापसिंह महाराज मंडळ,  शाहूपुरीतील दुर्गामाता मंडळ, सदरबझारमधील भारतमाता मंडळांसह विविध मंडळांनी दुर्गामूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. कराड शहराची ग्रामदेवता असलेल्या दैत्यनिवारणी मंदिर परिसरातही मोठा उत्सव साजरा केला जातो. देवीचे भक्त देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात. देवीला साडी-चोळी, पीठा-मिठाचा जोगवा, ओटी अर्पण करतात व सुखाचे वरदान मागतात. नवव्या दिवशी म्हणजे दसर्‍याच्या आदल्या दिवशी नवचंडी होम केला जातो. नवरात्र उत्सव काळात देवळातून देवीची वेगवेगळी पूजा बांधतात. ती आदिमाया शक्ती दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण, मंगल आणि कल्याण करणारी आहे, अशी यामागे भक्तांची धारणा असते. या उत्सवाला सुद्धा सध्या सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले आहे. या शिवाय कराड तालुक्यातील कार्वे येथील धानाई, राजमाची येथील जानाई, जखिणवाडी  येथील मळाई, मसूर येथील अंबाबाई या ठिकाणी पूजा मांडली जाते. या शिवाय देऊर, औंध, किन्हई या ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना केली जाते.  शहरातील अनेक भागात दुर्गामातेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. रात्री उशिरापर्यंत अनेक मंडळे मूर्ती घेवून जाताना दिसत होते. कोणी वाजत-गाजत तर कोणी टेम्पोमधून मूर्ती घेवून जात होते. त्यामुळे कुंभारवाड्यात गर्दी दिसत होती. पोलिसांनीही योग्य नियोजन केल्यामुळे कोठेही अनुचित प्रकार अथवा वाहतुकीला अडथळा आला नाही.  
  
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: