Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आता काश्मीरचा योग्य इतिहास लिहिण्याची वेळ आली आहे
ऐक्य समूह
Monday, September 30, 2019 AT 11:13 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 29 (वृत्तसंस्था) : गृहमंत्री अमित शहा यांनी आता काश्मीरचा योग्य इतिहास लिहिण्याची व खरी माहिती जनतेसमोर मांडण्याची वेळ आली आहे, असे म्हटले आहे. दिल्ली येथील कार्यक्रमप्रसंगी शहा बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर विचार मांडले.
शहा म्हणाले, स्वातंत्र्य मिळाले तेव्हा 630 राजवटींना एकत्र करण्यास एवढी अडचण आली नाही, मात्र जम्मू-काश्मीरला एक करण्यास 5 ऑगस्ट 2019 पर्यंत वाट पाहावी लागली. जेव्हा एखादा देश स्वतंत्र होतो तेव्हा त्याच्यासमोर सर्वात अगोदर सुरक्षेचा प्रश्‍न, घटना बनवण्याचा प्रश्‍न व असे अनेक प्रकारचे प्रश्‍न असतात. मात्र आमच्यासमोर 630 राजवटींना एकत्र करण्याच प्रश्‍न निर्माण झाला. या सर्व राजवटींना एकत्र आणून अखंड भारताची निर्मिती करणे, आमच्यासमोरील मोठे आव्हान होते. मात्र देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दृढतेमुळे आज 630 राजवटी एका देशाच्या रुपात जगासमोर आपले अस्तित्व टिकवून आहेत.
शहा म्हणाले, काश्मीरचा इतिहास मोडूनतोडून देशासमोर मांडला गेला. कारण ज्यांच्या चुका होत्या, त्यांच्याच वाट्याला इतिहास लिहिण्याची जबाबदारी आली होती. परिणामी सत्य हे समोर आलेच नाही. 
त्यामुळे आता काश्मीरचा योग्य इतिहास लिहिण्याची व तो जनतेसमोर मांडण्याची वेळ आली आहे.
कलम 370 हटवण्यास अद्याप दोन महिने देखील झाले नाहीत, तर लोक अटकेबद्दल ओरड करत आहेत. काँग्रेसवाल्यांनी तर 11 वर्षे अब्दुल्ला यांना तुरूंगात टाकले होते. अखेर कोणत्या कलमाखाली काँग्रेसने त्यांना इतकी वर्षे तुरूंगात टाकले होते. आज तीच काँग्रेस अब्दुल्ला यांची फार चिंता करत आहे, असे शहा म्हणाले.
 मानवाधिकारांचा मुद्दा उपस्थित करणार्‍यांवर टीका करताना ते म्हणाले, कलम 370 मुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचे पर्व सुरू झाले होते, ज्यामध्ये आतापर्यंत तब्बल 41 हजारांपेक्षा अधिक जणांचे जीव गेले आहेत. त्यांच्या विधवा व अनाथ मुलांची कधीच या मानवाधिकार संघटनावाल्यांना का चिंता वाटली नाही?. एखाद्या भागात टेलिफोन सुविधा बंद असणे हे मानवाधिकाराचे उल्लंघन नसते. मात्र 41 हजार जणांचा मृत्यू हे नक्कीच मानवाधिकारांचे उल्लंघन आहे.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: