Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘भारत की लक्ष्मी’ अभियान राबवण्याची गरज
ऐक्य समूह
Monday, September 30, 2019 AT 11:09 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 29 (वृत्तसंस्था) : दिवाळीनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ‘सेल्फी विथ डॉटर’च्या धर्तीवर ‘भारत की लक्ष्मी’ अभियान चालवण्याचे आवाहन केले आहे. आपल्या कुटुंबात, समाजात अशा अनेक मुली असतील ज्या त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याने देशाचे नाव उज्ज्वल करतात. या दिवाळीत अशा लक्ष्मींचा सन्मान करूया. ‘भारत की लक्ष्मी’ असा हॅशटॅग वापरून तुम्ही सोशल मीडियावर फोटो अपलोड करून त्यांचा सन्मान करू शकता, असे आवाहन मोदी यांनी आज ‘मन की बात’मध्ये केलं.
आपल्या दुसर्‍या कार्यकाळातील चौथ्या मन की बात कार्यक्रमात मोदींनी आज नशामुक्तीपासून प्लास्टिकमुक्तीपर्यंतचे आवाहन केले. देशवासीयांना दसरा, दिवाळी असा सणवारांच्या शुभेच्छा दिल्या. मन की बात सुरू होण्यापूर्वी एक ट्विट करत पंतप्रधानांनी आज आपल्यासोबत मन की बातमध्ये एक विशेष पाहुणा असेल असे म्हटले होते. त्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता होती. हा विशेष पाहुणा म्हणजे अन्य कोणी नव्हे तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर होत्या. मोदींनी लतादीदींसोबत त्यांच्या वाढदिवशी 28 सप्टेंबर रोजी झालेले संभाषण या कार्यक्रमात ऐकवले.
सणांचा खरा आनंद वंचितांच्या
चेहर्‍यावर हसू आणणं
पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांना सांगितले, की सणवारांचा खरा आनंद वंचित लोकांच्या चेहर्‍यावर हसू आणण्यात आहे. त्यांच्या आयुष्यातला अंधार दूर करण्यात आहे.   
तंबाखू, ई-सिगारेट सोडण्याचे आवाहन
मोदींनी तरुणांना तंबाखू, ई-सिगारेट सोडण्याचे आवाहन केले. अनेकदा किशोरवयीन फॅशन म्हणून, मजेसाठी तंबाखू सेवन करतात आणि स्मोकिंग सुरू करतात. मग नशेची शिकार होतात. ई-सिगारेटही सिगारेट, तंबाखूइतकीच धोकादायक आहे, असे ते म्हणाले.
सिस्टर मरियम थ्रेसिया याच्या कामाचा मोदींनी उल्लेख केला. ते म्हणाले, सिस्टर थ्रेसिया यांनी 50 वर्षे मानवतेची सेवा केली. पुढील महिन्यात त्यांचा व्हॅटिकन सिटीत सन्मान होणार असून  त्यांना संत घोषित केले जाणार आहे. भारत अशा असाधारण लोकांची कर्मभूमी आहे.
मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात टेनिसपटू डेनिल मेदवेदेवचाही उल्लेख केला. मेदवेदेवचे कौतुक करत तो तरुणांची प्रेरणी असल्याचे म्हटले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: