Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
उडतारे गावानजीक महामार्गावर खड्डा
ऐक्य समूह
Tuesday, October 01, 2019 AT 11:02 AM (IST)
Tags: re1
5भुईंज, दि. 30 : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर उडतारे गावानजीक हायवेवरच मोठे भगदाड पडले असून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 आजपर्यंत या हायवेचे काम करणार्‍या रिलायन्स कंपनीला व आय टी डी कंपनीला जिल्हा प्रशासन नेमके पाठीशी घालत आहे. आज- पर्यंत महामार्गावर जे जे अपघात घडले ते रिलायन्स कंपनीच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच घडलेले असून शेकडो जणांना यात आपले जीव गमवावे लागले असून हजारो लोक कायमचे जायबंदी झाले आहेत. महाराष्ट्र ट्रक टेम्पो असोसिएशनचे सर्वेसर्वा प्रकाश गवळी यांनी व जनतेने सुद्धा अनेक अपघातांना कारण ठरलेल्या रिलायन्स कंपनी विरूद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी सातारा जिल्हा प्रशासनाकडे केली परंतु या मागणीला सातारा जिल्हा प्रशासनाने नेहमीच केराची टोपली दाखवली.
साताराहून पाचवडच्या दिशेने येताना उडतारे गावानजीक महामार्गाला भला मोठा खड्डा पडला असून अनेक वाहने हा खड्डा चुकवत जात होती. परंतु यातील काही वाहन चालकांनी सोमवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान या खड्ड्याची पाहणी केली असता हा खड्डा अंदाजे 15 ते 20 फूट खोल असल्याचे आढळले.    
त्यामुळे प्रसंगावधान राखत स्थानिकांनी खडड्याच्या भोवती गवत व झाडे झुडपे ठेवून वाहन चालकांना इशारा करीत वाहतूक सुरळीत ठेवली. मात्र, रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी महामार्ग पोलीस हेल्पलाइन रिलायन्स आय.टी.डी. यापैकी कोणीही फिरकले नाही. याबाबत परिसरात संतप्त प्रतिक्रिया ऐकावयास मिळाल्या.
दरम्यान महामार्गाचे चौपदरीकरण व सहापदरी होत असताना महामार्गाच्या कामाबाबत अनेकवेळा निकृष्ट दर्जाचे काम उजेडात आणून सुद्धा संबंधितानी जाणीवपूर्वक जिल्हा प्रशासनाच्या व स्थानिकांच्या डोळ्यात धूळ फेकली आहे. यापूर्वी भुईंज, सुरूर, पाचवड येथील उड्डाण पुलाला पडलेले भगदाड सर्वांनी पाहिले आहे. परंतु आता टोल देऊन सुद्धा महामार्गाला भगदाड पडल्यामुळे वाहन चालकांना रिलायन्सच्या बेजबादारपणामुळे जीव गमावण्याची वेळ आली आहे. याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी त्वरित योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा महामार्गावरचे खड्डे आणि लोकांची जीवितहानी मोजण्याची वेळ आली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: