Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
निवडणुकीच्या तोंडावर फडणवीसांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का
ऐक्य समूह
Wednesday, October 02, 2019 AT 11:13 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 1 (वृत्तसंस्था) : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यभरात प्रचाराचा धडाका लावलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याबाबतचा खटला चालवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले.
मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांविरोधातील या तक्रारीबाबत दिलासा दिला होता. अ‍ॅड. सतीश उके यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली होती. यावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने खटला चालवण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी आपला निकाल 23 जुलैला राखून ठेवला होता.
2014 मध्ये फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपविल्याचे उके यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. हे दोन्ही गुन्हे नागपूरमधील असून त्यातील एक गुन्हा मानहानीचा आणि दुसरा गुन्हा फसवणुकीचा असल्याचे म्हटले आहे. फडणवीस यांनी दोन्ही गुन्हे लपवून खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा दावाही उके यांनी केला होता. शिवाय त्यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणीही केली होती. दरम्यान, उके यांची याचिका दाखल करून घ्यायची की नाही याची विचारणा करणारी नोटीस सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री फडणवीस यांना काही महिन्यांपूर्वी पाठवली होती. याच प्रकरणात उच्च न्यायालयाने फडणवीस यांना आधीच दिलासा दिलेला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने अगदी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा धक्का दिला आहे. राज्यात येत्या 21 ऑक्टोबर रोजी 288 विधानसभेच्या जागांसाठी मतदान होत आहे.
राज्यातील सर्व पक्षांनी विजयासाठी कंबर कसली आहे. राज्यात मुख्य मुकाबला भाजप-शिवसेना महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीदरम्यानच होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा द्यावा : मलिक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची महत्त्वाची माहिती लपवल्याचा खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे आम्ही स्वागत करतो, असे सांगताना निवडणूक प्रतिज्ञापत्रात मुख्यमंत्र्यांनी गुन्हा लपवला हे सर्वोच्च न्यायालयात सिद्ध झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्ह्याची माहिती लपवल्याचे सर्वोच्च न्यायालयात सिद्ध झाले आहे. माहिती लपवणे योग्य नाही. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांवर कारवाईचे आदेश दिले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. राज्याचा मुख्यमंत्री स्वतःच्या गुन्ह्याची माहिती लपवत असेल तर त्यांना राजकारणात राहण्याचाही अधिकार नाही. हे लक्षात घेता जोपर्यंत या घटनेचा निकाल येत नाही तोपर्यंत
मुख्यमंत्र्यांवर निवडणूक लढण्यास बंदी आणावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: