Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्ह्यात नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या सभा होणार
ऐक्य समूह
Saturday, October 05, 2019 AT 11:25 AM (IST)
Tags: lo1
शरद पवार, अजित पवार, डॉ. अमोल कोल्हे, अमोल मेटकरी यांच्याही तोफा धडधडणार
- शशिकांत कणसे
5सातारा, दि. 4 : सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक आणि जिल्ह्यातील आठ विधानसभा निवडणुकांसाठी दि. 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत असून या निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी,  केंद्रीय मंत्री अमित शहा या दोन प्रमुख नेत्यांसह भाजपचे मातब्बर नेते प्रचाराच्या रणधुमाळीत सहभागी होणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासह आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खा. डॉ. अमोल कोल्हे, अमोल मेटकरी यांच्याही तोफा धडाडणार असल्याने काही दिवसातच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचाराची राळ उडणार असल्याची चिन्हं आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधून श्री. छ. उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले तर काँग्रेसमधून जयकुमार गोरे, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कर्‍हाडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत माण-खटावचे भावी नेते शेखर गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भाजपमधून ना. दीपक पवार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षांतर्गत बंडाळी झाली. 
या बंडाळीमुळे भाजप सोडता जवळपास सर्वच पक्षात मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता निर्माण झाली. काही ठिकाणी भाजपने आपल्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलून आयात उमेदवारांना उमेदवारी दिल्याने उमेदवारी नाकारलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. अशा नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी सुरू असली तरी त्यांची नाराजी दूर करण्यामध्ये भाजपला किती यश येते, यावर त्यांच्या उमेदवारांच्या विजयाची गणिते निश्‍चित होणार आहेत. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना-भाजप- आरपीआय युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार महेश शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना केलेले शक्तिप्रदर्शन चर्चेचा विषय झाला असतानाच त्याच्या दुसर्‍या दिवशी आ. शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांचे समर्थक व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलेली राष्ट्रवादीची ताकद हा  चर्चेचा विषय ठरला आहे. एकूणच प्रचारास शुभारंभ होण्यापूर्वी उमेदवारांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनावरूनच विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्‍चिम महाराष्ट्रात विशेषत: सातारा जिल्ह्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून जिल्ह्यामध्ये कमळ फुलवण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या किमान दोन सभा व्हाव्यात, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले असून त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपवली असल्याचे वृत्त आहे. विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. चंद्रकांत पाटील, ना. गिरीश महाजन, ना. पंकजा मुंडे, खा. पूनम मुंडे हे सातारा जिल्ह्यात हजेरी लावणार असल्याचे वृत्त भाजपच्या सूत्रांनी दिले. ना. पंकजा मुंडे, खा. पूनम मुंडे यांचा धनगर समाजाशी असलेला स्नेह पाहता धनगर समाजाची मते भाजपकडे खेचण्याची जोरदार तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असल्याचे वृत्त आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये आता शह - प्रतिशहाचे राजकारण करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेली फोडाफोडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने दाखल केलेला गुन्हा या दोन घटनांच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीने होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपशी संघर्ष करण्याचा पवित्रा घेतला असल्याचे दिसून येते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खा. डॉ. अमोल कोल्हे, मुलुख मैदानी तोफ अमोल मेटकरी, खा. सुप्रिया सुळे यांना प्रचाराच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असल्याचे वृत्त आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येत्या काही दिवसात सातारा जिल्ह्यामध्ये प्रचाराची राळ मोठ्या प्रमाणावर उडणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे.
मोदी किंवा शहा यांची कराडमध्ये सभा?
सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्व. यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेऊन राजकारण केले. ही बाब लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांची एक संयुक्त सभा सातारा जिल्ह्यामध्ये घेण्याची रणनीती आखली जात असून ही सभा स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मभूमीत म्हणजेच कराड येथे होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. कराड येथे सभा घेऊन आ. बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सत्यजितसिंह पाटणकर यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना घेरण्याची जोरदार तयारी भाजपने केली असल्याचे समजते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: