Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
केळघर येथे घरातून तीन लाखांची चोरी
ऐक्य समूह
Monday, October 07, 2019 AT 11:20 AM (IST)
Tags: re1
5मेढा, दि. 6 : केळघर, ता. जावली येथील श्रीमती जनाबाई लक्ष्मण धनावडे (वय 75) यांच्या राहत्या घरात शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी घुसून तीन लाख दोन हजार पाचशे रूपयांचा ऐवज लुटून नेल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत मेढा पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, केळघर येथील बाजारपेठेत डांगरेघर रस्त्यावर श्रीमती जनाबाई धनावडे यांचे घर आहे. त्यांची दोन्ही मुले व्यवसायानिमित्त मुंबई येथे असतात. घरी त्या एकट्याच असतात. काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास श्रीमती धनावडे घरात बसलेल्या होत्या. त्यावेळी दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून कात्रीसारख्या कटर व सुर्‍याचा धाक दाखवून दमदाटी करत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. यामध्ये दोन सोन्याच्या बांगड्या, दोन सोन्याच्या पाटल्या, सोन्याची साखळी असलेली कणर्फुले, अंगठी, कुड्या, सोन्याची बोरमाळ व घरातील कपाटातील रोख रक्कम 40 हजार असा एकूण 3 लाख 5 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. चोरट्यांशी झटापट करताना श्रीमती धनावडे या जखमी झाल्या आहेत. बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर अशा प्रकारे चोर्‍या होवू लागल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात चोर्‍यांच्या संख्येेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पोलिसांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. या घटनेची नोंद मेढा पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नीळकंठ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, हवालदार नितीन जाधव हे तपास करत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: