Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सेना-भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्राची अधोगती : खर्गे
ऐक्य समूह
Monday, October 07, 2019 AT 11:23 AM (IST)
Tags: mn5
5मुंबई, दि. 6 (प्रतिनिधी)  : भाजप-शिवसेना सरकारच्या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली असून सर्वच समाजघटकांमध्ये सरकारविरोधात तीव्र संताप आहे. दुष्काळ, पूर हाताळण्यात सरकारला आलेले अपयश, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, आर्थिक मंदी या मुद्द्यांवर काँग्रेस पक्ष सरकारला घेरणार असल्याचे सांगत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी शिवसेना-भाजप सरकारवर हल्लाबोल केला. विधानसभा निवडणुकीसाठी टिळक भवन येथे उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अद्ययावत वॉर रूमच्या उद्घाटनानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
अविनाश पांडे यांच्या नेतृत्वाखाली अद्ययावत वॉर रूमद्वारे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन आणि समन्वय साधला जाणार आहे. या वॉर रूमद्वारे स्टार प्रचारकांच्या सभांचा समन्वय, सोशल मीडियावरील प्रचाराचे नियोजन केले जाणार आहे. उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि कायदेशीर मदत व सल्ला दिला जाणार आहेे. सरकारने पोलीस बळाचा वापर करून मध्यरात्री आरेमधील झाडांची कत्तल केली. याला विरोध करणार्‍या मुंबईकरांना, तरूण विद्यार्थी आणि पर्यावरणवाद्यांना पोलिसांनी अटक करून जेलमध्ये डांबले आहे.    
 डिस्कव्हरी चॅनलच्या मॅन वर्सेस वाईल्ड या कार्यक्रमामध्ये मोदीजींनी आपल्या काकांना लाकडाचा व्यवसाय करायचा होता. पण आजीने वृक्षामध्ये जीव असतो लाकडाचा व्यवसाय करू नको, असे सांगितले होते याची आठवण करून देत आपण पर्यावरणाबाबत किती संवेदनशील आहोत हे पंतप्रधानांनी त्यांच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना सांगावे, असे खर्गे म्हणाले. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसची वॉर रूम सज्ज आहे. या वॉर रूमद्वारे काँग्रेस पक्षाची भूमिका मतदारांपर्यंत पोहोचणे आणि प्रचारात समन्वय साधण्याचे काम केले जाणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आघाडीची पूर्ण तयारी झाली आहे. राज्यभरात स्टार प्रचारकांच्या सभा होणार आहेत. वॉर रूममधून सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून काँग्रेस पक्ष अधिक जोरदार पध्दतीने प्रचार अभियान राबवेल.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: