Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राधाकृष्ण विखे-पाटलांच्या उमेदवारीला उच्च न्यायालयात आव्हान
ऐक्य समूह
Monday, October 07, 2019 AT 11:22 AM (IST)
Tags: mn4
5शिर्डी, दि. 6 (वृत्तसंस्था)  : शिर्डी मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढवत असलेले राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उमेदवारीवर काँग्रेसने घेतलेली हरकत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी फेटाळून लावल्यानंतर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून आव्हान दिले जाईल, असे काँग्रेस उमेदवार सुरेश थोरात यांनी जाहीर केले. विखे-पाटील यांनी जे शपथपत्र दाखल केले आहे, ते नोटरी कायद्यानुसार नसून साधे दस्त आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरविणे कायद्याने बंधनकारक ठरते, असे थोरात यांनी सांगितले.
शिर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे राधाकृष्ण विखे-पाटील निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपले नातेवाईक सुरेश थोरात यांना काँग्रेसतर्फे उभे केले आहे. 
या दोघा प्रमुख उमेदवारांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. शनिवारी अर्जाची छाननी होती. यावेळी सुरेश थोरात यांनी विखे-पाटील यांच्या उमेदवारीला हरकत घेणारा अर्ज दाखल केला. विखे-पाटलांनी नामनिर्देश अर्ज दाखल करताना जे शपथ पत्र दाखल केले आहे ते कायदेशीर नाही. नोटरी कायद्यानुसार ते नसून एक साधे दस्त आहे. त्यात अनेक त्रृटी आहेत. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात यावा, अशी मागणी त्यांनी शिर्डीचे निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांच्याकडे केली होती. त्यावर दुपारी दोन्ही बाजूनी युक्तिवाद झाले. मात्र, या हरकती फेटाळून विखे-पाटील यांचा अर्ज वैध ठरविला.
निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या या निर्णयाने विखे-पाटलांना मोठा दिलासा मिळाला असला तरी सुरेश थोरात यांनी या निर्णयाविरोधात औरंगाबाद खंडपीठात सोमवारी याचिका दाखल करून आव्हान दिले जाईल, असे सांगितले. त्यामुळे विखे-थोरात यांच्यातील राजकीय लढाई उच्च न्यायालयात कितपत टिकते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: