Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
30 मतदारसंघात मातब्बरांची बंडखोरी, युतीला मोठा तडाखा !
ऐक्य समूह
Wednesday, October 09, 2019 AT 11:18 AM (IST)
Tags: mn2
5मुंबई, दि.7 (प्रतिनिधी) : पक्षाच्या व मित्रपक्षांच्या अधिकृत उमेदवाराला आव्हान देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बंडोबांना थंड करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांची सोमवारी दिवसभर धावाधाव सुरू होती. नेत्यांची मनधरणी व भविष्यातील वायद्यांमुळे काही बंडखोरांनी आपली तलवार म्यान केली असली तरी जवळपास 30 मतदारसंघात मातब्बर बंडखोर रिंगणात राहिल्याने सर्वच पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व शिवसेना-भाजप महायुती या दोन्ही बाजूच्या नेत्यांचे आज बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. मात्र काही ठिकाणी विरोधकांनी समन्वयाची भूमिका घेऊन युतीविरुद्ध एकास एक उमेदवार देण्यात यश मिळवले आहे. राष्ट्रवादीने दोन मतदारसंघात आपला उमेदवार मागे घेऊन मनसेला पाठिंबा दिला आहे.
वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेने विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांच्याऐवजी मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांना उमेदवारी दिल्यामुळे तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली. आज बरेच प्रयत्न करूनही त्यांनी माघार घेतलेली नाही.
शिवसेना-भाजपचे
बंडखोर रिंगणात !
खटाव-माण व कणकवली मतदारसंघात शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षाचे अधिकृत उमेदवार आमने-सामने उभे राहिले आहेत.
वर्सोवा मतदारसंघात भाजपच्या भारती लव्हेकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या नगरसेविका राजूल पटेल यांनी बंडखोरी केली आहे तर अंधेरी मतदारसंघात शिवसेनेच्या रमेश लटके यांच्याविरुद्ध भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी बंडखोरी केली आहे. कल्याण पश्‍चिम मतदारसंघात शिवसेनेच्या विश्‍वनाथ भोईर यांना भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांनी बंडखोरी करून आव्हान दिले आहे तर कल्याण पश्‍चिममध्ये भाजपच्या गणपत गायकवाड यांच्या विरोधात शिवसेनेच्या धनंजय बोडरे यांनी बंडखोरी केली आहे. नवी मुंबईत शिवसेनेच्या विजय माने यांनी भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे.
मीरा-भायंदरमध्ये भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांना माजी महापौर गीता जैन यांनी आव्हान दिले आहे. असाच प्रकार राज्यात अनेक ठिकाणी झाल्याने युतीत परस्परांबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राष्ट्रवादीचा मनसेला पाठिंबा !
पुण्याच्या कोथरूड मतदारसंघात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीने मनसेला पाठिंबा जाहीर केला होता. आज ठाणे शहर मतदारसंघात राष्ट्रवादीने आपले उमेदवार सुहास
देसाई यांचा अर्ज मागे घेऊन मनसेच्या अविनाश जाधव यांना पाठिंबा दिला तर याचा मोबदला म्हणून मनसेने नाशिकमध्ये अशोक मुर्तडक यांची उमेदवारी मागे घेऊन राष्ट्रवादीच्या बाळासाहेब सानप यांना पाठिंबा दिला.
काँग्रेसपुढेही बंडखोरीचे आव्हान !
काँग्रेसलाही अनेक ठिकाणी बंडखोरीचा सामना करावा
लागत आहे. वर्सोवा मतदारसंघात काँग्रेसच्या बलदेव खोसा यांच्याविरुद्ध काँग्रेस नगरसेवक जगदीश कुट्टी यांनी बंडखोरी
केली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: