Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
288 मतदारसंघांत 3 हजार 239 उमेदवार रिंगणात !
ऐक्य समूह
Wednesday, October 09, 2019 AT 11:14 AM (IST)
Tags: mn1
5मुंबई, दि. 7 (प्रतिनिधी) : विधानसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले आहे. राज्यातील 288 मतदारसंघात 3 हजार 239 उमेदवार अंतिमतः रिंगणात राहिले आहेत. चिपळूण मतदारसंघात सर्वात कमी 3 तर नांदेड दक्षिण मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 38 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सोमवारी दुपारी 3 पर्यंत शेवटची मुदत होती. विविध मतदारसंघात उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने 3 हजार 239 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. अकोले, शहादा, बोरिवली, माहिम, वांद्रे पश्‍चिम या मतदारसंघात प्रत्येकी चार उमेदवार रिंगणात आहेत. नांदेड जिल्ह्यातील भोकर या मतदारसंघातून 91 उमेदवारांनी अर्ज भरला होता. मात्र अर्ज मागे घेतल्यानंतर आता तिथे फक्त 7 उमेदवार रिंगणात आहेत. 15 उमेदवारसंख्येपर्यंत 1 बॅलट युनिट, 35 उमेदवार असतील तिथे 2 बॅलट युनिट लावण्यात येणार आहेत. त्यापेक्षा जास्त उमेदवार असतील तिथे 3 बॅलट युनिट लावण्यात येणार आहेत.  मतदार यादीत 40 लाख बोगस मतदार असल्याचा दावा बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यावर मतदार याद्यांचे सातत्याने पुनर्निरीक्षण केले जाते. पुनर्निरीक्षणावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचाही समावेश करण्यात येतो. 31 ऑगस्टपासून ते आतापर्यंत 2 लाख मतदारच वाढले असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
आशिष देशमुख यांची तक्रार दाखल
नागपूर पश्‍चिम मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरूद्ध आशिष देशमुख अशी लढत होत आहे. आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणूक अर्ज प्रतिज्ञापत्रासंदर्भात निर्माण झालेल्या वादावरून स्थानिक निवडणूक अधिकार्‍यांच्या विरोधात तक्रार केली आहे. ही तक्रार
तपासून लवकरच निर्णय देण्यात येणार असल्याची माहिती दिलीप शिंदे यांनी दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: