Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ
ऐक्य समूह
Thursday, October 10, 2019 AT 11:17 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 9 (वृत्तसंस्था) :  केंद्र सरकारी कर्मचार्‍यांना मोदी सरकारने दिवाळी भेट दिली आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा 50 लाख कर्मचारी व 65 लाख निवृत्ती वेतनधारकांना मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची माहिती दिली. नव्या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचार्‍यांचा भत्ता 12 टक्क्यांवरून 17 टक्के झाला आहे. वाढीव भत्ता जुलै 2019 पर्यंत कर्मचार्‍यांना मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार ही वाढ करण्यात आली असून या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर 16 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.
‘पीओके’च्या विस्थापितांना मदत
पाकव्याप्त काश्मीरमधून आलेल्या विस्थापितांना साडेपाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णयही सरकारने घेतल्याचे जावडेकर यांनी सांगितले. ‘पाकव्याप्त काश्मीरमधून विस्थापित होऊन देशाच्या विविध भागात विखुरले गेलेले व पुन्हा जम्मू-काश्मीरमध्ये स्थायिक झालेल्या 5300 कुटुंबांना ही मदत दिली जाणार आहे. विस्थापितांच्या बाबतीत झालेली ऐतिहासिक चूक सुधारण्याच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे,’ असे जावडेकर यांनी सांगितले. 
‘आयुष्मान भारत’ला चालना देण्याचा प्रयत्न
‘आयुष्मान भारत’ योजनेला अधिक चालना देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. पश्‍चिम बंगाल व दिल्ली या दोनच राज्यांनी या योजनेची अंमलबजावणी केलेली नाही. या योजनेंतर्गत आतापर्यंत 31 लाख लोकांची कार्ड तयार झाली आहेत, अशी माहिती जावडेकर यांनी दिली. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधारकार्डच्या सक्तीचा नियमही शिथिल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: