Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सुशीलकुमार शिंदे यांच्यावर शरद पवार भडकले
ऐक्य समूह
Thursday, October 10, 2019 AT 11:20 AM (IST)
Tags: mn3
5जळगाव, दि. 9 (वृत्तसंस्था) : ‘मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असून माझ्या पक्षाची स्थिती मला अधिक चांगली माहिती आहे. सुशीलकुमार शिंदे हे त्यांच्या पक्षाबाबत बोलले असावेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीकुमार शिंदे यांना उत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत सुशीलकुमार शिंदे सांगू शकत नाहीत. ते काँग्रेस पक्षाबाबत सांगू शकतात, असेही पवार यांनी सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता थकले असून भविष्यात दोन्ही पक्ष एक होणार आहेत, आम्ही एकाच आईची लेकरे आहोत आणि एकाच आईच्या  मांडीवर दोन्ही पक्ष वाढलेले आहेत, असे वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केले होते.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता थकले आहेत, हे सुशीलकुमार शिंदे यांचे वाक्य विधानसभा निवडणुकीसाठी झंझावती प्रचारदौरे करत तरुणांना प्रभावित करणार्‍या शरद पवार यांना जराही रुचले नाही. सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी त्यांना खडे बोल सुनावले. विधानसभा निवडणुकीतील आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना शरद पवार यांनी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेत सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील विकासाची सद्यस्थिती, भाजप सरकारची पाच वर्षातील कामगिरी अशा विविध मुद्यांवर मते मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेस पक्षात विलीनीकरण करण्याबाबतच्या सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या वक्तव्यानंतर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेत्यांनी विलीनीकरणावर प्रतिक्रिया देण्याचे मात्र टाळले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला
विधानसभा निवडणुकीनंतर यांचे पक्ष रिकामे होणार असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण झाले तर किमान विरोध तरी करू शकतील, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला.
राष्ट्रवादीचे अस्तित्व वेगळे : अजित पवार
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या विलीनीकरणाबद्दल  ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार
शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना सुशीलकुमार शिंदे यांचे हे मत वैयक्तिक
असून ही त्यांची इच्छा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वेगळे अस्तित्व आहे. सुशीलकुमार काँग्रेसचे मोठे नेते आहेत. मात्र निवडणुकीला सामोरे जाताना कोणताही संभ्रम असणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी विलीनीकरणाची शक्यता फेटाळून लावली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: