Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पुलवामा जिल्ह्यात चकमकीत तीन दहशतवादी ठार
ऐक्य समूह
Wednesday, October 23, 2019 AT 10:52 AM (IST)
Tags: na3
5श्रीनगर, दि. 22 (वृत्तसंस्था) : पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे. पुलवामामध्ये अवंतीपुरातील राजपुरा गावात ही चकमक झाली. या चकमकीत ठार झालेले दहशतवादी हे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेत सक्रिय होते. त्यातील दोघे पाकिस्तानी नागरिक असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अवंतीपुरामध्ये दहशतवादी सक्रिय असून त्यांनी एका घरात  आश्रय घेतल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली होती. त्याआधारे आज दुपारी युद्धपातळीवर शोधमोहीम हाती घेण्यात आली. राष्ट्रीय रायफल्स, जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि एसओजीच्या पथकांनी संयुक्तपणे या कारवाईत भाग घेतला. संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली. राजपुरा गावात जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. त्यामुळे सापळ्यात अडकलेल्या दहशतवाद्यांनी नाकाबंदी भेदून निसटण्याचा बेत आखला होता. मात्र सुरक्षा दलांनी त्यांना यशस्वी होऊ दिले नाही.
दहशतवादी एका घरात दबा धरून बसले होते. त्या ठिकाणाला राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी चारही बाजूंनी घेरताच दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. चार तासांच्या चकमकीनंतर तीनही दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले. या कारवाईनंतर घटनास्थळी शोधमोहीम राबविली असता मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा व स्फोटके आढळून आली.
बेछूट गोळीबाराचा व्हिडिओ
भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 1 मिनिट 54 सेकंदांचा हा व्हिडिओ असून  यात दोन्ही बाजूने होत असलेला बेछूट गोळीबार स्पष्टपणे दिसत आहे. ज्या घरात दहशतवादी दबा धरून बसले होते तिथून गोळीबार करण्यात येत होता. त्याला चारही बाजूने घेरण्यात आले व नंतर दहशतवाद्यांना टिपण्यात आले. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.
दरम्यान, दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून यापैकी दोघे जण पाकिस्तानचे नागरिक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. खबरदारी म्हणून संपूर्ण परिसरात सतर्कतेचे आदेश जारी करण्यात आला असून सुरक्षा यंत्रणानी व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे.
अतिरेक्यांच्या गोळीबारात लष्कराचा अधिकारी शहीद
जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये मंगळवारी सकाळी नियंत्रण रेषेपासून 500 मीटर अंतरावर असलेल्या भारतीय सुरक्षा चौकीवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर शहीद झाला आहे. या घटनेनंतर भारतीय जवानांनी प्रत्युत्तरादाखल जोरदार गोळीबार सुरू केला असून परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एकीकडे दहशतवाद्यांनी भारतीय सुरक्षा चौकीला लक्ष्य केले असताना एलओसीवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. आज पाकने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. एलओसीवर शांतता राखण्याचे आवाहन सोमवारीच करणार्‍या पाकने शब्द न पाळता आज पुन्हा एकदा आपले रंग दाखवले आहेत. यापूर्वी रविवारी पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. त्यात दोन जवान शहीद झाले होते तर एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्याला चोख प्रत्युत्तर देत भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील तीन दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. भारताच्या कारवाईत 22 दहशतवादी व पाकचे 10 सैनिक ठार झाले होते.
भारताच्या कारवाईनंतर पाककडून सोमवारी नरमाईची भाषा करण्यात आली होती. सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याची गरज आहे. त्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न व्हायला हवेत, असे पाकचे म्हणणे होते. काही राजकीय पुढारी व पत्रकारांना एलओसी परिसराचा दौरा करायचा आहे, असेही सांगण्यात आले होते. भारताने पाकच्या या भूमिकेवर सकारात्मक प्रतिसादही दिला होता. मात्र, सोमवारची रात्र उलटताच पाकिस्तानने पुन्हा आज सीमेवर कुरापती काढल्या. पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. शाळा असलेल्या परिसरात गोळीबार करण्यात आला. या स्थितीत पाकवर विश्‍वास कसा ठेवायचा, असा सवाल भारतीय लष्कराशी संबंधित सूत्रांनी उपस्थित केला आहे.
पाक विमानांच्या घिरट्या
भारताने पाकव्याप्त काश्मिरात केलेल्या कारवाईनंतर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत. पाकव्याप्त काश्मिरात पाक हवाईदलाची विमाने घिरट्या घालताना दिसली आहेत. त्यामुळे उत्तरेकडील सीमा भागात भारतीय लष्कर सतर्क झाले आहे. पंजाबमध्ये होशियारपूर परिसरात भारतीय हवाईदलाची विमाने सज्ज ठेवण्यात आली आहेत. अतिमहत्त्वाच्या ठिकाणांवरही सतर्कता बाळगण्यात येत आहे, अशी माहिती लष्करातील सूत्रांनी दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: